मुंबई (प्रतिनिधी) : कोरोना लसीकरण करण्याबाबत केंद्र सरकारबरोबर राज्य सरकारनेही युद्ध पातळीवर तयारी सुरू ठेवली आहे. लस कशी देणार याबाबतचे मायक्रो प्लॅनिंग करून कार्यपद्धती निश्चित करण्यात आली आहे. ज्या तारखेला लस द्यायची आहे, त्या संबंधीचा मेसेज त्या व्यक्तीला करण्यात येईल. त्यानंतर ती व्यक्ती आल्यावर ओळख पटवली जाईल. त्यानंतरच त्याला लस देण्यात येईल, अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.

टोपे यांनी सांगितले की, लसीकरण करण्याबाबत हेल्थ वर्कर्स, अत्यावशक सेवेतील कर्मचारी, ५० वर्षांवरील नागरिक, इतर आजार असलेले ५० वर्षांवरील नागरिक यांची माहिती संकलित केली जात आहे. तसेच १८ हजार लोकांना प्रशिक्षण दिले जात आहे. स्टोरेजसाठी कोल्डचेन व्यवस्था केली आहे.

केंद्र सरकार लस पुरवणार असून राज्य सरकारच्या अखत्यारीतील कामे आम्ही पूर्ण करत आहोत. लॉजिस्टिक, डेटा तयार करण्याची कामे सुरु आहेत. लसीकरणाच्या परिणामाबाबत एक युनिट तयार केले आहे. लसीकरणाबाबत सीरम आणि भारत बायोटेक यांनी केंद्र सरकारकडे परवानगी मागितली आहे, असेही टोपे यांनी सांगितले.