मुंबई (प्रतिनिधी) : भारतीय संघाचा धडाकेबाज फलंदाज रोहित शर्मा ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर जावा, अशी आपल्या सर्वांची इच्छा आहे. पण तो फिट झाला पाहिजे. जर तो फिट झाला, तर निवड समिती पुन्हा त्याला संघात घेण्याबद्दल नक्कीच विचार करेल, असे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी म्हटले आहे.

गांगुली पुढे म्हणाले की, रोहित शर्माने आयपीएलमधील पुढील सामने खेळू नयेत. जेणे करून त्याची दुखापत वाढू नये. मी त्याला खेळताना पहिले नाही. फक्त रोहितच नाही तर जलद गोलंदाज इशांत शर्मा देखील दुखापतीमुळे संघातून बाहेर झाला आहे. या दोघांच्या फिटनेसवर आम्ही नजर ठेवून आहोत.

दरम्यान, आयपीएलमध्ये रोहित शर्माच्या गैरहजेरीत कायरॉन पोलार्डकडे संघाची धुरा देण्यात आली आहे. मुंबईने गुणतक्त्यात अव्वल स्थान मिळवून प्ले ऑफमध्ये प्रवेश केला आहे. आता त्यांची लढत पहिल्या क्वालिफायरमध्ये दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध होणार आहे. या सामन्यात रोहित शर्मा फिट होईल आणि पुन्हा एकदा मैदानात दिसणार का ? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.