कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापुरात कार, मोटारसायकली, मोबाईल हँडसेट ॲक्सेसरीज चोरणाऱ्या दोघा सराईत गुन्हेगारांना जुना राजवाडा पोलिसांनी आज (मंगळवारी) अटक केली. राजकुमार वसीम मलिक (वय २४, रा. नवश्या मारुती मंदिराजवळ, राजारामपुरी) व आदित्य भीमराव दिंडे (वय १८, रा. शाहूनगर, राजारामपुरी) अशी त्यांची नावे आहेत. पोलिसांनी त्याच्याकडून २ कार, २ मोटारसायकली,  ५ मोबाइल हँडसेट व मोबाईलचे ॲक्सेसरीज असा सुमारे दीड लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

पोलिसांकडून दिलेल्या माहितीनुसार, कोल्हापुरातील यल्लमा मंदिर ओढ्याजवळील एका कारखान्यात रंगकामासाठी सोडलेली कार चोरट्यांनी लंपास केली होती. ही कार रेकॉर्डवरील गुन्हेगार राजकुमार मलिक व आदित्य दिंडे यांनी चोरल्याची माहिती जुना राजवाडा ठाण्याचे पो. नि. प्रमोद जाधव यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी गुन्हे शोध पथकाचे पोलिस उपनिरीक्षक योगेश पाटील व पथकाला तपास करण्याच्या सूचना दिल्या होत्या.

चोरीची कार मलिक व दिंडे या दोघांनी मैल खड्डा परिसरातील एका बंद घराच्या बाजूला लपवून ठेवल्याची माहिती गुन्हे शोध पथकाला मिळाली होती. त्यानुसार या पथकाने या ठिकाणी जाऊन ही कार घेऊन जात असलेल्या मलिक व दिंडे यांना ताब्यात घेतले. अधिक चौकशी केली असता त्यांनी सहा गुन्ह्यांची कबुली दिली.