मुंबई (प्रतिनिधी) : धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करत भाजप नेते व कार्यकर्त्यांनी देशभरात तांडव वेबसीरीजच्या दिग्दर्शक व निर्मात्याविरुद्ध ठिकठिकाणी गुन्हे दाखल केले आहेत. यावरून शिवसेनेने भाजपवर निशाणा साधला  आहे. अर्णब गोस्वामी व्हॉट्सअॅप चॅट प्रकरणावर भाजपने ‘तांडव’  सोडा, पण भांगडाही केला नाही, अशा शब्दांत शिवसेनेने ‘सामना’च्या अग्रलेखातून भाजपचा खरपूस समाचार घेतला आहे.  

भाजपातील काही शेंबड्यांनी आता अशी मुक्ताफळे उधळली आहेत की, अर्णबचे गुप्त ‘चॅट’ उघड झाल्याबद्दल मुंबई पोलिसांवर कारवाई करा. अरे शेंबड्यांनो, मुळात तुमच्या त्या अर्णबने देशाच्या सुरक्षेसंदर्भातही गुप्त माहिती उघड केली त्यावर आधी बोला. उलट मुंबई पोलिसांनी देशावर उपकारच केले आहेत. हे अस्तनीतले साप देशाच्या मुळावरच आले होते. त्यांचा फणा मुंबई पोलिसांनी ठेचला तर भाजपच्या शेंबड्यांना संताप का यावा?

‘तांडव’ नावाची एक वेब सीरिज सध्या प्रदर्शित झाली आहे. सध्याच्या राजकारणाचे वास्तव दाखवणारी ही सीरिज असल्याचे सांगतात. पण या सीरिजमध्ये हिंदू देवदेवतांविषयी काही आक्षेपार्ह विधाने असल्याचा बोभाटा भारतीय जनता पक्षाने केला. त्यात प्रामाणिकपणाचा लवलेश नक्की किती ही शंका आहेच. कारण जो ‘तांडव’विरोधात उभा ठाकला आहे तोच भाजप भारतमातेचा अवमान करणाऱ्या त्या अर्णब गोस्वामीसंबंधात तोंडात मिठाची गुळणी घेऊन गप्प का बसला आहे? हिंदुस्थानी सैनिकांचा, त्यांच्या हौतात्म्यांचा घोर अपमान जितका गोस्वामीने केलाय तितका अपमान पाकड्यांनीही केला नसेल,  असे शिवसेनेने म्हटले आहे .