मुंबई (प्रतिनिधी) : सरकारी कर्मचाऱ्यांची जनमानसातील प्रतिमा आदर्शवत होण्यासाठी त्यांना ड्रेसकोड लागू करण्यात आला आहे. सरकारी कार्यालयात कोणते आणि कसे कपडे घालावेत याबाबतच्या मार्गदर्शक सूचना राज्य सरकारने प्रसिद्ध केल्या आहेत. अधिकारी व कर्मचारी यांची वेशभूषा ही अशोभनीय, गबाळी तसेच अस्वच्छ असल्याचा त्याचा परिणाम एकदंरीतच कामकाजावर होतो. त्यामुळे ड्रेसकोड लागू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.

याबाबत खालील मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत…

१) गडद रंगांचे चित्रविचित्र नक्षीकाम/चित्रे असलेला पोशाख, जीन्स टी-शर्ट परिधान करून सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी शासकीय कार्यालयामध्ये येऊ नये.

२) सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आठवड्यातून एकदा (शुक्रवारी) खादी कपड्याचा पेहराव परिधान करावा.

३) महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कार्यालयामध्ये शक्यतो चपला, सॅन्डल, बूट (शूज) यांचा वापर करावा.

४) कार्यालयामध्ये स्लिपरचा वापर करू नये.

५) महिला कर्मचाऱ्यांनी कार्यालयात साडी, सलवार/चुडीदार कुर्ता, ट्राऊझर पँट व त्यावर कुर्ता अथवा शर्ट तसेच आवश्यकता असल्यास दुपट्टा यासह पेहराव करावा. पुरुष कर्मचाऱ्यांनी शर्ट, पॅन्ट/ ट्राऊझर पॅन्ट असा पेहराव करावा.