नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय टपाल सेवेच्या पेमेंट बँकेकडून ग्राहकांसाठी आता नवी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यासाठी पेमेंट बँकेकडून डाकपे – DakPay हे नवे अ‍ॅप सुरु करण्यात आले आहे. या अ‍ॅपच्या मदतीने ग्राहकांना तात्काळ पैसे हस्तांतरित करता येतील.

पूर्वीच्या काळी टपाल खात्याची मनी ऑर्डरची सेवा खूपच लोकप्रिय होती. मात्र, काही महिन्यांपूर्वी ही सेवाही बंद करण्यात आली होती. त्याजागी ई-मनी ऑर्डर सेवा सुरु करण्यात आली होती. त्यामध्ये इंटरनेटद्वारे तात्काळ पैसे पाठवण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली होती. मात्र, आता डाकपे अ‍ॅपमुळे पैसे पाठवणे आणखीनच सोपे झाले आहे. मंगळवारी या अ‍ॅपचे अनावरण करण्यात आले. त्यामुळे ग्राहकांना बँकिंग आणि पैशांची डिजिटल देवाणघेवाण करता येईल. या पेमेंटला यूपीआयशी (UPI) जोडण्यात आले आहे. त्यामुळे आता पोस्टाच्या ग्राहकांना गुगल पे, फोन पे आणि इतर पेमेंट अ‍ॅपसारखे व्यवहार करता येणार आहेत.