कोल्हापूर (प्रतिनिधी) : बावड्यातील जनतेनेच राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या विजयाची सुरवात करून दिली आहे. बावड्यातील जनतेचे क्षीरसागर यांच्यावर प्रेम आहे. त्यामुळे बावड्यातील जनतेच्या पाठबळाचे श्रेय कोणत्याही नेत्याने घेवू नये, असा पलटवार शिवसेना उपशहरप्रमुख सुनील जाधव यांनी केला. कसबा बावडा येथील शिवसेना विभागीय कार्यालयात आयोजित पदाधिकारी बैठकीत ते बोलत होते. 

माजी आमदार राजेश क्षीरसागर यांनी अनेकवेळा जाहीर भाषणात आपण बावडेकरांमुळे आमदार झालो असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे कोण कोणामुळे आमदार झाले, हे कळण्याइतकी जनता सुज्ञ आहे, अशी टीका माजी नगरसेवक मोहन सालपे यांनी केली होती. या टीकेला जाधव यांनी उत्तर दिले आहे.

जाधव पुढे म्हणाले की, शिवसेनेस मानणारा मोठा वर्ग बावड्यात आहे. त्यामुळे बावडा हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. त्यामुळे येथील जनतेने राजेश क्षीरसागर यांच्यावर नेहमीच प्रेम केले आहे. तर क्षीरसागर यांनीही बावड्याच्या विकासाला चालना दिली आहे. पुढील काळातही बावड्यातील जनता क्षीरसागर यांच्या पाठीशी ठाम उभी राहील, यात काडीमात्र शंका नाही.

या बैठकीस ज्येष्ठ शिवसैनिक संजय लाड, शिवसेना विभागप्रमुख राजू काझी, भीमराव बिरंजे, रविंद्र माने, सचिन पाटील, अक्षय खोत, राहुल माळी, राकेश चव्हाण, कृष्णा लोंढे, अभिजीत यादव, गुरुदास ठोंबरे, कपिल पोवार, किरण इंगवले आदी शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.