वाडीरत्नागिरी (प्रतिनिधी) : ‘ना चांगभलंचा गजर, ना भाविकांची अलोट गर्दी’, कोरोनामुळे पुन्हा एकदा श्री जोतिबा डोंगर शांत शांत झालाय. श्री क्षेत्र जोतिबाच्या खेट्यांना कोरोनामुळे यंदाही बंदी केल्यामुळे आज (रविवार) पहिल्या खेट्याला जोतिबा डोंगर पूर्णपणे शांत जाणवत होता. दरम्यान, आज पहिल्या खेट्यानिमित्त श्री जोतिबाची खडी अलंकारिक महापूजा बांधण्यात आली होती. 

जोतिबा डोंगराच्या आजूबाजूच्या ४ किलोमीटर परिक्षेत्रात कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. खेट्यांना जाण्यासाठी पहाटे ३ पासूनच भाविकांची गर्दी डोंगरावर होत असते. चांगभलंचा गजर आणि गुलालाच्या उधळणीत जोतिबा डोंगर न्हाऊन निघत असतो. यंदा मात्र पहिल्या खेट्यापासूनच बंदीमुळे डोंगरावर जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे. त्यामुळे भाविकांच्यामध्ये नाराजी दिसून येत आहे. बंदी असूनदेखील आज पहाटे बरेच भाविक निदान बाहेरून तरी आपल्या जोतिबाचं दर्शन घेता येईल, या आशेने आले होते. पण, पोलीस बंदोबस्तामुळे त्यांना डोंगरावर जाता न आल्याने त्यांचा हिरमोड झाला.