सावरवाडी (प्रतिनिधी) : करवीर तालुक्यातील बहिरेश्वर येथील लोकनियुक्त सरपंच साऊबाई बचाटे यांच्या विरोधात अविश्वास ठराव बहुमतांनी आज (गुरुवार) मंजूर झाला. यावेळी  गावसभेत मतदान घेण्यात आले. त्यामध्ये हा ठराव बहुमताने मंजूर करण्यात आला. गट विकास अधिकारी जयंत उगले यांच्या अध्यक्षतेखाली प्रक्रिया पार पडली.

थेट जनतेतून निवडलेल्या सरपंचांच्या विरोधात ठराव संमत झालेली जिल्ह्यातील ही पहिलीच घटना आहे. आज  सकाळी ८ ते ११ यावेळेत १९३४ मतदार नोंदणी झाली. सकाळी ११ ते दुपारी  ४ वाजेपर्यत या कालावधीत १९०३ लोकांनी मतदान केले. यामध्ये ४२ मते अवैध झाली. तर ठरावाच्या बाजूने ११११ मते मिळाली. तर विरोधात ७५० मते पडली.

जुलै २०१८ मध्ये झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे  नेते सीताराम पाटील, सूर्यकांत दिंडे  भगवान दिंडे यांच्या नेतृत्वाखालील आघाडीतून सरपंच बचाटे यांच्यासह आघाडीची सत्ता आली होती. पण नियोजित वेळेत राजीनामा न दिल्यामुळे येथे मोठा राजकीय तेढ निर्माण झाला होता.

यावेळी करवीर पं.स.चे विस्तार अधिकारी संदेश भोईटे, विजय नलवडे, वाय. के. जाधव,  सहाय्यक फौजदार निवास पवार, यांच्यासह अधिकारी उपस्थितीत होते.