राज्यातील सर्व महापालिका क्षेत्रात उद्यापासून रात्रीची संचारबंदी : मुख्यमंत्री

राज्यात अधिक सतर्कता बाळगण्याचे आवाहन

0
424

मुंबई (प्रतिनिधी) : ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवा विषाणूच्या संसर्गाने अनेकजण बाधित झाले आहेत, त्यामुळे तिथे काही भागात पुन्हा लॉकडाऊन पुकारण्यात आला आहे. केंद्र आणि राज्य सरकारने याची गंभीर दखल घेतली आहे. केंद्र सरकारने ब्रिटनमधून येणाऱ्या विमानांवर बंदी घातली आहे. २२ डिसेंबरच्या रात्रीपासून ब्रिटनमधून येणारे एकही विमान भारतात उतरू शकणार नाही. तसेच ब्रिटनला जाऊ शकणार नाही. तर मुख्यमंत्र्यांकडून राज्यात १५ दिवस आणखी सतर्कता बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे राज्यातील सर्व महापालिका क्षेत्रात २२ डिसेंबर ते ५ जानेवारीपर्यंत रात्री ११ ते पहाटे सहापर्यंत संचारबंदी असेल असा आदेश देण्यात आला आहे

ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूचा नवा प्रकार आढळून आल्याने राज्य सरकार सावध झाले आहे.  या पार्श्वभूमीवर आज (सोमवार) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खबरदारीच्या उपाययोजनांसाठी वर्षा निवासस्थानी बैठक घेतली. राज्यात उद्यापासून महानगरपालिका क्षेत्रात रात्री ११ ते पहाटे सहापर्यंत संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला असून ५ जानेवारीपर्यंत तो लागू राहील. त्याचबरोबर संपूर्ण युरोप आणि मध्य-पूर्व देशांतून येणाऱ्या सर्व प्रवाशांना ते विमानतळावर उतरल्यापासून १४ दिवस संस्थात्मक क्वारंटाईन तर अन्य देशांमधून येणाऱ्या प्रवाशांना होम क्वारंटाईन करण्याचा निर्णय घेण्यात आला. नव्या विषाणूमुळे पुढील १५ दिवस अधिक सतर्क रहावे लागेल, असे मुख्यमंत्री ठाकरे यांनी या वेळी सांगितले.

मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगितले की,  संपूर्ण युरोपीय देशांसह मध्य-पूर्व देशांकडून महाराष्ट्रात उतरणाऱ्या प्रवाशांना आजपासून १४ दिवस संस्थात्मक क्वारंटाईन बंधनकारक करण्यात आले आहे. क्वारंटाईन कालावधी पूर्ण झाल्यानंतरच त्यांना घरी सोडण्यात येईल. ज्या विमानतळांवर आंतरराष्ट्रीय विमाने उतरतात तेथील महापालिका आयुक्तांनी अशा प्रवाशांना क्वारंटाईन करण्यासाठी हॉटेल आणि स्वतंत्र हॉस्पिटलची व्यवस्था करावी. त्याचबरोबर युरोपातून आलेल्या प्रवाशांना नव्या विषाणूची लक्षणे असल्यास त्यांच्यासाठी स्वतंत्र रुग्णालयाची व्यवस्था करावी. अन्य देशांमधून आलेल्या प्रवाशांची तपासणी करून त्यांना होम क्वारंटाईन केले जाईल. तपासणी करणाऱ्या विमानतळावरील सर्व कर्मचाऱ्यांना पीपीई किट देण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.

या बैठकीस मुख्य सचिव संजय कुमार, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव मनोज सौनिक, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, प्रधान सचिव विकास खारगे, मुंबई महापालिका आयुक्त आय. एस. चहल, मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास आदी उपस्थित होते.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here