दुचाकी वाहनांची नवी नोंदणी मालिका २१ पासून : डॉ. स्टीव्हन अल्वारिस

0
82

कोल्हापूर (प्रतिनिधी) : खासगी दुचाकी वाहनांची जुनी नोंदणी मालिका MH09-FR दि. १८ डिसेंबरपर्यंत संपणे अपेक्षित आहे. त्यानंतर प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत नवीन दुचाकी नोंदणी मालिका MH09-FS  दि. २१ डिसेंबर रोजी सुरु करण्यात येत आहे. इच्छुक वाहनधारकांनी पसंती क्रमांकाचे अर्ज २१ डिसेंबर रोजी सकाळी ९.४५ ते २ या वेळेतच स्वीकारण्यात येतील, अशी माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. स्टीव्हन अल्वारिस यांनी दिली.

डॉ. स्टीव्हन अल्वारिस यांनी सांगितले की, लिलाव पद्धतीद्वारे वाहन नोंदणी क्रमांकाची मागणी करतेवेळी खालील सूचनांचे पालन करावयाचे आहे.

पसंतीचा नोंदणी क्रमांक घेण्यासाठी अर्जासोबत त्या क्रमांकासाठी असलेल्या मूळ रकमेचा डी. डी. (धनाकर्ष) जोडणे आवश्यक आहे. धनादेश किंवा पे ऑर्डर देऊ नये. धनाकर्ष काढताना SBI TRE. BRANCH KOLHAPUR GRAS या नावानेच काढलेला असावा. पसंतीच्या क्रमांकाच्या मूळ रकमेचा एकच धनाकर्ष दि. २१ डिसेंबर रोजी सकाळी ९.४५ ते २ या वेळेत आणून द्यावा. धनाकर्ष शक्यतो स्टेट बँक ऑफ इंडिया  या बँकेचाच असावा. धनाकर्षाच्या मागे अर्जदाराचे नाव, मोटार वाहनाचा प्रकार, मोबाईल क्रमांक व मागणी केलेली मालिका पसंती क्रमांक लिहिणे आवश्यक आहे.

एखाद्या नोंदणी क्रमांकासाठी एकापेक्षा जास्त अर्ज आल्यास त्या क्रमांकाचा दुसऱ्या दिवशी लिलाव करण्यात येईल. त्यासाठी अर्जदारांकडून २२ डिसेंबर रोजी जादा रकमेचा स्वतंत्र धनाकर्ष बंद लिफाप्यात सकाळी ९.४५ ते २ या कालावधीत जमा करणे बंधनकारक राहील. एकपेक्षा जास्त अर्ज असलेल्या क्रमांकाचा लिलाव दि. २२ रोजी दुपारी ४ वा. कार्यालयाच्या सभागृहात घेण्यात येईल. याची सर्वांनी नोंद घ्यावी. अर्जदार व प्राधिकृत प्रतिनिधी  यांनाच लिलावास उपस्थित रहाण्याची परवानगी देण्यात येईल. अर्जदाराने ओळखपत्र आणणे आवश्यक आहे. तसेच प्राधिकृत प्रतिनिधी उपस्थित राहणार असेल तर त्याच्याकडे प्राधिकार पत्रासह ओळखपत्र असणे अनिवार्य आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here