नागपूर (प्रतिनिधी) : राज्य शासनाच्या मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेतील दुसऱ्या टप्प्यात ७.५ अश्वशक्तीचे ७५०० नवीन सौर कृषिपंप आस्थापित करण्यासाठी राज्याचे ऊर्जामंत्री ना. डॉ. नितीन राऊत यांनी मंजुरी दिली आहे. त्यानुसार महावितरणकडून विशेष वेबपोर्टलद्वारे कृषिपंपांसाठी ऑनलाईन अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे.

शेतकऱ्यांना दिवसा सिंचन करणे शक्य व्हावे. याकरिता राज्य शासनाने एक लाख पारेषण विरहीत सौर कृषिपंप आस्थापित करण्यासाठी ‘मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजना’ सुरु केली आहे. महावितरणच्या माध्यमातून ही योजना राबविण्यात येत आहे. या योजनेतील पहिल्या टप्प्यात २५,००० सौर कृषिपंपाच्या आस्थापनेचे उद्दिष्ट साध्य झाले आहे. आता दुसऱ्या व तिसऱ्या टप्यात आणखी ७५,००० सौर कृषिपंपांच्या आस्थापनेचे उद्दिष्ट आहे. तथापि, शेतकऱ्यांची मागणी लक्षात घेता ऊर्जामंत्री ना. डॉ. नितीन राऊत यांनी या योजनेच्या टप्पा २ व ३ अंतर्गत ७.५ अश्वशक्तीचे ७५०० सौर कृषिपंप आस्थापित करण्याकरिता मंजुरी दिलेली आहे.

तर महावितरणकडून वेबपोर्टलद्वारे ७.५ अश्वशक्तीच्या सौर कृषिपंपाच्या आस्थापनेसाठी ऑनलाईन अर्ज स्वीकारण्यास सुरुवात झाली असून ज्या गावांची सुरक्षीत पाणलोटक्षेत्रांची उपशाची स्थिती ६० टक्क्यांपेक्षा कमी आहे, अशा क्षेत्रातील गावांमधील विहीरींमध्ये व कूपनलिकांमध्ये नवीन ७.५ अश्वशक्तीचे सौर कृषिपंप देण्यात येणार आहे. मात्र कोणत्याही वर्गवारीतील क्षेत्रामध्ये ६० मीटरपेक्षा जास्त खोल असलेल्या विहीरींमध्ये अथवा कूपनलिकेमध्ये ७.५ अश्वशक्तीचे सौर पंप देण्यात येणार नाही. अर्ज करण्यासाठी शेतकऱ्यांनी महावितरणच्या  HYPERLINK “http://www.mahadiscom.in/solar/” www.mahadiscom.in/solar/ या वेबपोर्टलला भेट देण्याचे आवाहन ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी केले आहे. तसेच या योजनेसंबंधी सर्व माहिती या वेबपोर्टलवर उपलब्ध आहे.

सदर योजनेअंतर्गत सौर कृषीपंपासाठी सर्वसाधारण गटाच्या लाभार्थ्यांकडून १० टक्के व अनुसूचित जातीच्या / अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांकरिता ५ टक्के लाभार्थी हिस्सा म्हणून लाभार्थ्यास भरणे आवश्यक आहे. ७.५ अश्वशक्ती सौर कृषिपंपाची ८.९ टक्के जीएसटीसह किंमत ३,३४,५५० असून खुल्या प्रवर्गातील लाभार्थ्यांना १० टक्के हिस्सा म्हणून ३३,४५५ रुपये केवळ तर अनुसूचित जाती/ जमातीच्या लाभार्थ्यांना ५ टक्के हिस्सा म्हणून १६,७२८ रुपये केवळ भरणा करावा लागेल. या योजनेचा पात्र शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी केले आहे.