महापालिकेवर राष्ट्रवादीचाच झेंडा..!

0
268

कोल्हापूर (प्रतिनिधी) : पाच वर्षात महापालिकेत काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना अशी आघाडी कार्यरत होती. पण यातील प्रत्येक पक्षाला आपलेच अधिक नगरसेवक निवडून यावेत्, असे वाटते. म्हणून हे तिन्ही पक्ष यावेळी स्वतंत्र लढतील. राष्ट्रवादीचाच झेंडा महापालिकेवर फडकवण्यासाठी कार्यकर्ते हाडाची काडं आणि रक्ताचं पाणी करून राबतील, असा विश्वास राष्ट्रवादीचे नेते आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला. येथील शासकीय विश्रामगृहात ते पत्रकारांशी बोलत होते.

ते म्हणाले की, यापूर्वीच्या महापालिकेच्या तीन निवडणुका काँग्रेस, राष्ट्रवादीने स्वतंत्र लढून निवडून आल्यानंतर आघाडी करून कामकाज केले होते. यावेळीही असेच होईल. पक्ष स्वतंत्र असल्याने प्रत्येकास आपलेच नगरसेवक अधिक यावेत, असे वाटते. इच्छुकांचीही संख्या अधिक आहे. यावेळी शहरात काँग्रेसचे तीन आमदार आहेत. म्हणून पालकमंत्री सतेज पाटील यांना आपली ताकद वाढल्याचे वाटते. म्हणून स्वतंत्रपणे लढण्याचा निर्णय घेतला आहे.

जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुका सुरू आहेत. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मोठया ताकदीने या निवडणुकीत सहभाग घेत आहे. लोकशाहीत निवडणुकीने निवडून आल्यास ताकद कळते. यामुळे ग्रामपंचायतीमध्ये बिनविरोधपेक्षा निवडणुका झाल्या पाहिजे, असे मला वाटते. बिनविरोध आणि सरपंचपदासाठी कोटीच्या बोली लागत आहेत. हे चुकीचे आहे. याची चौकशी करण्याची मागणी राज्य निवडणूक आयोगाकडे केली आहे, असे ही त्यांनी यावेळी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here