सावरवाडी (प्रतिनिधी) : ग्रामीण भागाचे सामाजिक ऐक्य अबाधित राखण्यासाठी क्रीडा स्पर्धा महत्त्वाच्या आहेत खेळांच्या माध्यमातून राष्ट्रीय एकात्मता जोपासली जाते, असे प्रतिपादन युवक काँग्रेसचे नेते प्रकाश तिबिले यांनी केले. करवीर तालुक्यातील कसबा बीड येथे पार पडलेल्या फुटबॅाल स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिक वितरण समारंभप्रसंगी ते बोलत होते. कसबा बीड फुटबॉल क्लबतर्फे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

पांडुरंग विकास सेवा संस्थेचे चेअरमन अमित वरुटे म्हणाले की, क्रीडा स्पर्धेतून तरुणांना नवी प्रेरणा मिळते. ग्रामीण भागातील युवकांनी मेहनतीने क्रीडा क्षेत्रात नावलौकिक प्राप्त करावा. या वेळी विविध मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिकांचे वितरण करण्यात आले. या प्रसंगी संतोष मोरे, श्रेयस भाट, संकेत तिबिले यांची भाषणे झाली.

या स्पर्धेत आंबेवाडी फुटबॉल क्लबने प्रथम, ए. वाय. बालिंगा फुटबॉल क्लबने द्वितीय, बीड फुटबॉल क्लबने तिसरा क्रमांक पटकावला. या स्पर्धेत एकूण ३२ संघांनी भाग घेतला होता. स्वप्नील पाटील व अनिकेत पोवार यांनी पंच म्हणून काम पाहिले.