मुंबई (प्रतिनिधी) : स्वा. सावरकर यांना ‘भारतरत्न’ देण्यावरून मुख्यमंत्री ठाकरे यांनी भाजपला सुनावले होते. आता याच मुद्द्यावरून महाविकास आघाडीतील मतभेद समोर आले आहेत. शिवसेनेचे जे मत ते आमचे नाही. जनभावना असेल तर आमचाही सावरकर यांना भारतरत्न देण्यास पाठिंबा राहील. मात्र, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आणि लोकराजा छ. शाहू महाराज यांना भारतरत्न पुरस्कार प्रदान करण्यात यावा, अशी आमची मागणी असल्याचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज (शुक्रवार) स्पष्ट केले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले की, केंद्र सरकारने सावरकरांना भारतरत्न का दिला नाही. सावरकरांना भारतरत्न मिळावे यासाठी केंद्राकडे दोनदा पत्र पाठविले होते. भारतरत्न कोणाला देतात? पंतप्रधान आणि समितीचा हा हक्क आहे. वीर सावरकरांबद्दल शिवसेनेने कधीही आपली भूमिका बदलली नाही. भाजपाने आपल्या पूर्वीच्या मित्रपक्षाला हिंदुत्व शिकवू नये.

शिवसेनेने स्वा. विनायक दामोदर सावरकर यांना भारतरत्न देण्याची मागणी केल्याच्या आज नाना पटोले यांनी म्हटले की, शिवसेनेची भूमिका ही आमची भूमिका नाही. सावित्रीबाई फुले आणि शाहू महाराज यांना भारतरत्न बहाल करण्यात यावा. भारतरत्न प्रदान करणे ही केंद्र सरकारची जबाबदारी आहे, राज्य सरकारची समस्या नाही.