कोल्हापूर (प्रतिनिधी) : ‘नाबार्ड’कडून कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला जिल्ह्यातील सर्व गावे, दुर्गम वाड्या-वस्त्यावरील ग्राहकांना एटीएम सेवा देण्यासाठी तीन मोबाईल व्हॅनकरिता ४५ लाख रुपये तसेच बॅंकेच्या ग्राहकांना पुरविलेल्या रुपे डेबिट (किसान क्रेडिट कार्ड) सुविधेपोटी १२ लाख रुपये, ३०० मायक्रो एटीएमसाठी ६७ लाख याप्रमाणे सुमारे सव्वा कोटींचे अर्थसाहाय्य जमा झाले असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. ए. बी. माने यांनी दिली.

बँकेचे अध्यक्ष व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखालील संचालक मंडळाने विविध सुविधा जिल्ह्यातील ग्राहकांना उपलब्ध करून दिल्या आहेत. नाबार्डकडून आर्थिक समावेशन निधी अंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यातील दुर्गम गावे व वाड्या-वस्त्यांवर तसेच शाखा नसलेल्या गावांमधून बँकिंग सुविधा पोहोचविण्यासाठी मोबाईल व्हॅनकरीता बॅंकेस अर्थसहाय्य दिलेले आहे. तसेच ग्राहकांना रुपे डेबिट कार्डद्वारे कोणत्याही एटीएम मधून रक्कम काढणेची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे.

बॅंकेने जिल्ह्यात ‘गाव तेथे बॅंकेची शाखा’ या धर्तीवर मायक्रो एटीएम सुविधा कार्यान्वित करणेचे निश्चित केले आहे. याकरिता जिल्ह्यातील दुर्गम गावे व वाड्या-वस्त्यांमध्ये ५०० मायक्रो एटीएमद्वारे ग्राहकांना बॅंकिंग सुविधा पुरविली जाणार आहे. याकरिता नाबार्डकडून ३०० मायक्रो एटीएमसाठी ६७ लाखांचे अर्थसहाय्य दिले जाणार असून लवकरच मायक्रो एटीएम सुविधा कार्यान्वित केली जाणार आहे, अशी माहितीही माने यांनी दिली.