कोल्हापूर (प्रतिनिधी) : प्लॅस्टिक पिशव्या बंदी आदेशाचा भंग केल्याप्रकरणी  महापालिकेच्या पथकाने लक्ष्मीपुरी, ताराबाई पार्क, कसबा बावडा परिसरातील १४ दुकानांना प्रत्येकी पाच हजार प्रमाणे ७० हजारांचा दंड वसूल केला. यामुळे संबंधित चौदा दुकानांना चांगलाच दणका बसला आहे.

प्लास्टिक पिशव्या वापरावर बंदी असतानाही काही व्यापारी, व्यावसायिक प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर करीत आहेत. त्यांच्यावरही महापालिका पथकामार्फत धडक मोहीम सुरु केली आहे. पथकाने लक्ष्मीपुरी ताराबाई पार्क, कसबा बावडा परिसरातील पंचवटी स्वीटस, नॅशनल बेकरी, मुकुंदप्रभा, केक फॉर यू, पुरोहीत स्वीटस, चॉईस पान शॉप, डायमंड चिकन, बाबा ट्रेडींग कंपनी, श्री इंगवले, खाटीक मटण, ओम मेडीकल, श्री साई मेडीकल, ज्योती स्वीटस, किरण ट्रेडर्स अशा १४ दुकानांवर कारवाई करुन प्रत्येकी ५ हजार रूपयांची दंडाची कारवाई करण्यात आली. ही कारवाई मुख्य आरोग्य निरीक्षक जयवंत पोवार, विभागीय आरोग्य निरीक्षक निखिल पाडळकर, राहूल राजगोळकर, गीता लखन, ऋषीकेश सरनाईक, शिवाजी शिंदे, महेश भोसले, यांनी केली आहे.