कोल्हापूर (प्रतिनिधी) : खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी कोल्हापूर विमानतळास भेट देऊन विमानतळावर सुरू असलेल्या विकासात्मक कामांची आढावा बैठक आज (शुक्रवार) येथे घेतली. विमानतळ विस्तारीकरण व नाईट लँडींग सुविधा, भूसंपादन आदीसह प्रलंबित कामे मार्गी लावण्यासाठी संबंधित विभागांशी लवकरच बैठक घेणार असल्याचे खासदार संभाजीराजे यांनी यावेळी सांगितले.   

विमानतळ विस्तारीकरणासाठी भूसंपादन करण्याबाबत महाराष्ट्र शासनाकडून अद्याप कागदपत्रांची पूर्तता प्रलंबित आहे. शिवाय काही परवानग्या रखडलेल्या आहेत. या अडचणींचे त्वरीत निवारण करून प्रलंबित कामे लवकरात लवकर मार्गी लावण्यासाठी कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालय व कोल्हापुरातील संबंधित शासकीय विभागांच्या अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात येणार असल्याचे खासदार संभाजीराजे  यांनी सांगितले.

दरम्यान, विमानतळ विस्तारीकरण व नाईट लँडींग सुविधांबाबत खासदार संभाजीराजे यांनी भारतीय विमानतळ प्राधिकरणाचे चेअरमन अरविंद सिंह, मेंबर ऑफ ऑपरेशन्स आय.एन.मूर्ती व नागरी विमान उड्डाण संचलनालयाचे (डीजीसीए) चेअरमन अरूण कुमार यांच्यासोबत दिल्ली येथे उच्चस्तरीय बैठक घेतली होती. या बैठकीत कोल्हापूर विमानतळावर नाईट लँडींगसाठी डीजीसीएची तत्वतः मान्यता आहे. मात्र, राज्य शासनाकडून आवश्यक बाबींची पूर्तता होणे अद्याप प्रलंबित असल्याचे सांगण्यात आले. या पार्श्वभूमीवर खासदार संभाजीराजे यांनी कोल्हापूर विमानतळ प्रशासनासोबत आज बैठक घेतली.

या बैठकीस कोल्हापूर विमानतळाचे संचालक कमलकुमार कटारिया, विमानतळ सल्लागार समितीचे सदस्य प्रवीण पवार आदीसह कोल्हापूर विमानतळ प्रशासनाचे अधिकारी उपस्थित होते.