शिरोळ (प्रतिनिधी) : मागील काही दिवसांपासून शिरोळ तालुक्यातील दत्तवाड-दानवाड परिसरात कुत्र्यांनी धुमाकूळ घातला आहे. कुत्र्यांनी नागरिकांसह पाळीव प्राण्यांवर हल्ला चढवून त्यांचे प्राण घेतले आहेत. या कुत्र्यांचा प्रशासनाने त्वरित बंदोबस्त करावा, नागरिकांनीही सावधगिरी बाळगावी, शेतामध्ये एकटेदुकटे जाऊ नये, प्रतिकारासाठी जवळ शस्त्रे बाळगावीत, अशा सूचना खा. धैर्यशील माने यांनी केल्या. खा. माने आणि शिरोळ तालुकाप्रमुख वैभव उगळे यांनी आज (मंगळवार) दत्तवाड-दानवाड परिसरात कुत्र्यांच्या हल्ल्यात मयत व जखमी झालेल्या नातेवाईकांची भेट घेतली. यानंतर त्यांनी पोलिसांसह स्थानिक प्रशासनाला विविध सूचना केल्या.

खा. माने यांनी स्थानिक पोलिस प्रशासन, सरपंच, पोलीस पाटील, ग्रा. पं. सदस्य, रेस्क्यू फोर्स व नागरिकांशी चर्चा केली. नंतर ते म्हणाले की, नागरिकांनी सावध राहावे, शेतात काम करण्यास जात असताना एकटे जाऊ नये, आपल्याजवळ लाठी, खुरपे अशा प्रकारची शस्त्रे जवळ ठेवावीत. प्रशासनाने लवकरात लवकर या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा. त्याचबरोबर पोलीस प्रशासनाने नगरपालिकेला पत्र लिहून कळवावे की नसबंदी करण्यासाठी घेऊन गेलेली कुत्री पुन्हा गावामध्ये सोडू नये, या प्रकारच्या सूचना देण्यात आल्या.

या वेळी तानाजी मोहिते, रवींद्र माने, स.पो.नि. विकास आडसूळ,  चंद्रकांत मोरे, युवा सेनेचे निलेश तवंदकर, मंगेश पाटील, भगतसिंग रजपूत, विजय नाईक, सागर परीट, संतोष गायकवाड, अमीर तहसीलदार, श्रेयस धुमाळे, विश्वनाथ रजपूत यांच्यासह परिसरातील नागरिक उपस्थित होते.