इचलकरंजी (प्रतिनिधी) : राजकीय वैमनस्यातून झालेल्या संदीप मागाडे याच्या खुनाचा मुख्य सूत्रधार के. के. ग्रुपचा म्होरक्या, ग्रा.पं. सदस्य कुमार कांबळे आणि त्याच्या साथीदारांना तत्काळ अटक करुन त्यांना मोक्का लावावा, अशी मागणी करीत आज (गुरुवार) कबनूरमधील बौध्द समाज आणि ग्रामस्थांच्या वतीने प्रांत कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.  

मागाडे खून प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी वीस जणांवर गुन्हा दाखल करून काही संशयीतांना अटक केली होती. उर्वरीत आरोपींना अटक करण्यात विलंब होत असल्याने कबनूरमधील बौध्द समाज आणि ग्रामस्थांनी सर्व आरोपींच्या अटकेसाठी मोर्चा काढण्याचा प्रशासनाला इशारा दिला होता. तसेच या खूनाच्या प्रकरणातील मुख्य सुत्रधार कुमार कांबळे याच्यावरही कारवाई करण्यात पोलिसांकडून टाळाटाळ होत असल्याचा आरोप फिर्यादीच्या समर्थकांनी केला होता.

त्यामुळे संशयीतांवर मोक्कातंर्गत कठोर कारवाई करावी, अशी मागणी आज आंदोलकांनी केली. या मोर्चात नगरसेवक राहूल खंजीरे, प्रमोद पाटील, नारायण फरांडे, ग्रा.पं.सदस्या शोभा पोवार, ग्रा.पं.सदस्या सुलोचना कखट्टी यांच्यासह ग्रामस्थ सहभागी झाले होते. यावेळी शिवाजीनगर ठाण्याचे पो. नि. श्रीकांत पिंगळे यांनी आंदोलकांना शांततेचे आवाहन केले. सर्व आरोपींना तत्काळ अटक करू, असे आश्वासन दिले.

या मोर्चामध्ये नितीन कामत, उमाजी कांबळे, नेताजी कांबळे, महावीर कांबळे, सुहास कांबळे, विकास फरांडे, प्रणिल कामत, ऋषी माने, गौरव आठवले, राकेश कांबळे यांच्यासह बौध्द समाज बांधव, कबनूर ग्रामस्थ सहभागी झाले होते.