मुंबई (प्रतिनिधी) : महाराष्ट्रातील वाहनांवरील मराठी भाषेत नंबर प्लेट लावण्यास परवानगी नसेल, तर तातडीने त्याबाबत कायदा करुन परवानगी द्यावी आणि महाराष्ट्रातच मराठी भाषिकांची होत असलेली गळचेपी थांबवावी, अशी मागणी मनसे आमदार राजू पाटील यांनी राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांना पत्र लिहून केली आहे.

महाराष्ट्रात काही वाहनांवर मराठीमध्ये नंबर प्लेट असलेली दिसून येते. मात्र, वाहतूक पोलिसांकडून मराठीत नंबर असलेल्या वाहनांवर कारवाई केल्याचे प्रकार समोर आले आहेत. यावरून वाहतूक पोलीस आणि वाहनधारकांमध्ये वाद होऊ लागले आहेत. वास्तविक महाराष्ट्रासाठी मराठी भाषेत नंबर प्लेट लावण्याबाबत राज्य सरकारनेच पुढाकार घेणे आवश्यक आहे. याबाबत महाराष्ट्रात कायदाच केला पाहिजे होता. परंतु मराठी भाषेची सरकारकडूनच गळचेपी होत असेल, तर भाषेचे संवर्धन आणि आपली मराठी अस्मिता कशी जपणार ? असा प्रश्न करून राजू पाटील यांनी राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांना पत्र लिहिले आहे.