कोल्हापूर (प्रतिनिधी) : थेट पाईपलाईनव्दारे राधानगरी धरणातून शहरासाठी पाणी आणले जात आहे. हे काम ठेकेदार कंपनी संथ गतीने आणि निकृष्ट दर्जाचे करीत असल्याचा आरोप करीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे महापालिकेसमोर जोरदार निदर्शने करण्यात आली. यावेळी कंपनीच्या चुकीच्या कामकाजाकडे आयुक्त दुर्लक्ष करून गांधारीची भूमिका बजावत असल्याचाही आरोप त्यांनी केला.

थेट पाईपलाईनचे काम ११५ कोटींचे आहे. काम घेतलेली कंपनी पाईपलाईन टाकण्यासह इतर कामे संथ गतीने करीत आहे. पाईप टाकल्यानंतर रस्ता पूर्वीप्रमाणे व्यवस्थित करीत नाही. यासंबंधीची तक्रार व्हिडिओसह यापूर्वीच आयुक्तांकडे केली. तरीही आयुक्तांनी कोणत्याही प्रकारची कार्यवाही केलेली नाही. यामुळे ठेकेदार कंपनी आणि महापालिकेच्या संगनमतानेच थेट पाईपलाईनचे काम दर्जेदार होत नसल्याचा आरोपही आंदोलनकांनी केला आहे. या कामांतून कोटयवधीचा ठपला मारल्याचाही संशय व्यक्त होत आहे. याकडे लक्ष वेधण्यासाठी केलेल्या आंदोलनावेळी महापालिकेचा धिक्कार असो, ठेकेदार दास कंपनीच्या भ्रष्टाचाराची चौकशी झाली पाहिजे, आयुक्त साहेब बाहेर अशा घोषणा देण्यात आल्या.

आंदोलनात जिल्हा अध्यक्ष राजू जाधव, राजू बागवान, राज मकानदार, अमित फराकटे, किरण पोतदार, रमजान मकानदार आदी सहभागी झाले होते.