कोल्हापूर (प्रतिनिधी) : मतदारसंघाबरोबरच कोल्हापूर शहराचा सर्वांगीण विकास साधायचा आहे. यासाठी काही नव्या संकल्पना योजाव्या लागतील. हे काम केवळ लोकप्रतिनिधींचे नसून यामध्ये शहरातील सर्व स्तरातील नागरिकांनी सहभागी झाले पाहिजे. कोणत्याही विकासकामात लोकसहभाग महत्त्वाचा असतो, त्याशिवाय ते पूर्णत्वास येउच शकता नाही, असे मत आ. ऋतुराज पाटील यांनी व्यक्त केले. आज (बुधवार) आ. पाटील यांनी ‘लाईव्ह मराठी’च्या मुख्य कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. त्यानंतर त्यांनी विविध विषयांवर आपली दिलखुलास मते व्यक्त केली.

‘लाईव्ह मराठी’चे निवासी संपादक सरदार करले आणि व्यवस्थापकीय संपादक प्रमोद मोरे यांनी आ. पाटील यांचे स्वागत केले. आ. पाटील यांनी या वेळी शहरातील विविध प्रश्नांचा आढावा घेऊन कोणत्या उपाययोजना करता येतील याबाबत सविस्तर चर्चा केली. ते म्हणाले की, मी जरी कोल्हापूर दक्षिण मतदारसंघाचा आमदार असलो तरीही कोल्हापूर शहरावर माझे संपूर्ण लक्ष आहे. कोल्हापूरचे काही प्रश्न अद्यापही प्रलंबित आहेत. मात्र त्याला फक्त राजकीय नेते जबाबदार नसून काही प्रमाणात नागरिकांची अनास्थाही कारणीभूत आहे. यासाठी मी ‘लाईव्ह मराठी’च्या माध्यमातून शहरातील सर्व सामाजिक कार्यकर्ते आणि सर्व स्तरातील जाणकारांना आवाहन करत आहे की, शहराचे प्रश्न सोडवण्यासाठी नवीन कल्पना, सूचना असतील तर त्या जरूर कराव्यात. नवीन कल्पनांची योग्य प्रकारे अंमलबजावणी झाली पाहिजे. केवळ लोकप्रतिनिधींवर जबाबदारी देऊन चालणार नाही. लोकांनीही त्यामध्ये आपला सहभाग नोंदवला पाहिजे. सर्वांना बरोबर घेऊनच शहराची प्रगती साधणे शक्य आहे.

या वेळी ‘लाईव्ह मराठी’चे बिझनेस हेड किरण मोरे, मुख्य उपसंपादक विवेक जोशी, मुख्य प्रतिनिधी उत्तम पाटील, वरिष्ठ प्रतिनिधी भीमगोंड देसाई, उपसंपादक अविनाश सुतार, नरेंद्र देसाई, शहर प्रतिनिधी श्रीकांत पाटील,प्रथमेश तांबे, व्हिडिओ एडिटर आकाश कांबळे, कॅमेरामन रोहित सूर्यवंशी उपस्थित होते