कोल्हापूर (प्रतिनिधी) : जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. मात्र गावामध्ये गट तट निर्माण होऊन कटुता निर्माण होऊ नये म्हणून आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी मोठी घोषणा केली आहे. शिरोळ या आपल्या मतदारसंघातील ग्रामपंचायतीने येणारी निवडणूक बिनविरोध केली. तर त्या ग्रामपंचायतीला ५० लाखांचा विकास निधी देणार असल्याची घोषणा त्यांनी केली आहे. त्यांच्या या घोषणेमुळे आता काही ग्रामपंचायतींनी निवडणूक बिनविरोध करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत.

येत्या १५ जानेवारी रोजी ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत आहेत. यामध्ये शिरोळ विधानसभा मतदारसंघात एकूण ३२ ग्रामपंचायतींच्या निवडणुका लागल्या आहेत. या सर्वच ३२ ग्रामपंचायतींची आरोग्यराज्यमंत्री पाटील यड्रावकर यांनी मोठी घोषणा केली आहे. ग्रामपंचायत वगळता सर्वच निवडणुका या पक्षीय पातळीवर होत असतात. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीनंतर गावामध्ये गट तट निर्माण होऊन एकमेकांमध्ये कटुता निर्माण होत असते. हे टाळण्यासाठी ग्रामपंचायत बिनविरोध करणे महत्वाचे आहे. म्हणून मंत्री यड्रावकर यांनी बिनविरोध होणाऱ्या ग्रामपंचायतीस भरीव निधी देण्याचा निर्णय घेतला आहे.