कागल (प्रतिनिधी) : ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी कागल तालुक्यातील लिंगनूर दुमाला या गावात जाऊन दुपारी साडेतीन वाजता ग्रामपंचायतीसाठी मतदान केले. वास्तविक, कालच म्हणजेच गुरुवारीच मंत्री मुश्रीफ कोल्हापूरला पोहोचणार होते. परंतु  पक्षाच्या महत्त्वाच्या बैठकीसाठी त्यांना मुंबईतच थांबावे लागले. त्यामुळे, आज शुक्रवारी सकाळीच खास मतदानासाठी मुंबईवरून कारने निघालेल्या मुश्रीफ यांनी दुपारी लिंगनूर या गावात पोहोचत मतदानाचा हक्क बजावला.

लिंगनूर येथील श्री हनुमान चौकातील स्वमालकीच्या घरातून ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या मतदानाची नोंद आहे. लिंगनूर दुमाला ग्रामपंचायतसाठी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ गट, खा. संजय मंडलिक गट व माजी आमदार संजय घाटगे गट अशी संयुक्त जय हनुमान ग्रामविकास आघाडी आहे. तर विरोधात भाजपचे पॅनेल आहे. आज मतदानासाठी ना. मुश्रीफ यांनी मुंबईहून थेट लिंगनूर दुमाला येथे येत मतदानाचा हक्क बजावला.

मतदानानंतर ना. हसन मुश्रीफ म्हणाले की, कोणत्याही निवडणुका या लोकशाहीचा उत्सव असतात. त्यामुळे निकोप पद्धतीने लोकप्रतिनिधी निवडण्यासाठी जास्तीत जास्त किंबहुना सर्वच मतदारांनी मतदान प्रक्रियेमध्ये सहभागी होणे अत्यावश्यक आहे.