मुंबई (प्रतिनिधी) : राज्यातील ग्रामीण भागातील घरकुल योजनांना चालना देण्यासाठी ग्रामविकास विभाग आणि आयआयटी (मुंबई), रिलायन्स फाऊंडेशन आणि हुडको यांच्यामध्ये भागीदारी करण्यात आल्याची घोषणा ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी आज (मंगळवार) केली. राज्यात स्थानिक भौगोलिक परिस्थितीनुसार घरकुल डिझाईन करणे, कमी खर्चातील पण दर्जेदार घरकुलाचे तंत्रज्ञान विकसित करणे तसेच भूकंप, वादळ आदी नैसर्गिक आपत्तींचा सामना करु शकणाऱ्या घरकुलांची निर्मिती करण्यासाठी आयआयटी (मुंबई) यांची मदत घेतली जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

ना. मुश्रीफ यांनी सांगितले की, ‘आयआयटी’च्या सहयोगातून राज्यातील ग्रामीण गृहनिर्माण अभियंत्यांना प्रशिक्षण देण्यात येणार असून इंटर्नशिपच्या माध्यमातून ‘आयआयटी’मधील विद्यार्थ्यांचा ग्रामीण गृहनिर्माण योजनांमध्ये सहभाग घेतला जाणार आहे. हुडको (हाऊसिंग आणि अर्बन डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन) यांच्याकडून ग्रामीण गृहनिर्माणासाठी तांत्रिक सहकार्य तसेच सीएसआर आदी माध्यमातून आर्थिक सहकार्य घेण्यात येणार आहे. मोठ्या गावांमध्ये बहुमजली इमारती तसेच हाऊसिंग कॉलनी आदींमध्ये ‘सीएसआर’च्या माध्यमातून मुलभूत सुविधांची निर्मिती करण्यासाठी तसेच कमी खर्चातील घरकुलाचे तंत्रज्ञान विकसित करण्यासाठीही हुडको सहकार्य करणार आहे. घरकुलविषयक विविध योजनांची माहिती संबंधित अधिकारी, कर्मचारी आणि लाभार्थ्यांपर्यंत ऑडीओ, व्हीडीओ तसेच टेक्स्ट मेसेजद्वारा पोहोचविण्यासाठी रिलायन्स फाऊंडेशन सहकार्य करणार आहे. महाआवास अभियानास ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात येत असल्याची घोषणाही मुश्रीफ यांनी केली.

मंत्रालयात या कार्यक्रमावेळी ‘ग्रामविकास’चे अपर मुख्य सचिव राजेशकुमार, ग्रामीण गृहनिर्माणचे संचालक डॉ. राजाराम दिघे, ‘आयआयटी’चे प्रा. प्रकाश नाथागोपालन, रिलायन्स फाऊंडेशनचे अभिजित ठाकरे, हुडकोचे प्रादेशिक प्रमुख व्ही. टी. सुब्रम्हण्यम, राज्य व्यवस्थापन कक्ष – ग्रामीण गृहनिर्माणचे उपसंचालक मंजिरी टकले, निलेश काळे आदी मान्यवर उपस्थित होते.