गडहिंग्लज (प्रतिनिधी) : कारखान्याची मशिनरी खूपच जुनी झाली आहे. त्यामुळे संचालक मंडळाने धाडसी निर्णय घेऊन हा प्लँट बदलताना रोज ५००० टन गाळप क्षमता, को-जनरेशन आणि डिस्टीलरी असा सक्षम प्लँट उभा करावा, अन्यथा या कारखान्याचे भवितव्य अंधूक असेल, अशी स्पष्टोक्ती ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी केली. आप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज तालुका सहकारी साखर कारखान्याच्या ४२ व्या गळीत हंगामाचा शुभारंभ आज (शनिवार) ना. मुश्रीफ यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

या वेळी मुश्रीफ यांनी सांगितले की, मुळात साखर कारखानदारी अडचणीत आहे. टनामागे ४०० ते ५०० रुपये तोटा सोसून कारखाने कर्जाच्या ओझ्याखाली दबत आहेत. साखरेचा दर ३१०० वरून ३४०० होणे गरजेचे आहे. अन्यथा, पुढील वर्षापर्यंत राज्यातील निम्म्याहून अधिक कारखाने बंद पडतील. ‘गोडसाखर’ची अवस्थाही बिकट असून मशिनरी ४२ वर्षे जुनी आहे. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकरी, कामगार आणि तोडणी – वाहतूकदार यांच्या भविष्याचा गंभीरपणे विचार करून संचालक मंडळाने धाडसी निर्णय घेणं गरजेचं आहे, असेही त्यांनी सुचवले.

या वेळी कारखान्याचे अध्यक्ष श्रीपतराव शिंदे, जि. प. उपाध्यक्ष सतीश पाटील आदिंसह कारखान्याचे संचालक, कर्मचारी, शेतकरी उपस्थित होते.