कोल्हापूर (प्रतिनिधी) : हृदयरोग असलेल्या रुग्णांना ॲन्जिओप्लास्टी किंवा बायपास शस्त्रक्रिया करावी लागते. हार्ट ब्लॉकेजसाठी  ॲन्जिओप्लास्टी आणि त्याहीपेक्षा मोठ्या शस्त्रक्रियेसाठी बायपास सर्जरी करावी लागते. बायपास सर्जरी करताना रुग्णांच्या शरीराची बरीचशी चिरफाड करावी लागते. पण आता छोटेसे छिद्र पडून त्यातून   हृदयाची शस्त्रक्रिया करण्याची नवी पद्धत कोल्हापुरात उपलब्ध झाली आहे. ‘मिनीमॅली इनोवासिया कार्डियाक सर्जरी’  म्हणजे ‘एमआयसीएस’ ही शस्त्रक्रिया पद्धत उजळाईवाडी येथील अथायु हॉस्पिटलमध्ये उपलब्ध केल्याची माहिती हॉस्पिटलचे डॉ. बसवराज कडलगी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

डॉ. बसवराज कडलगी म्हणाले की, हृदय रोगाबाबतच्या सर्व शस्त्रक्रिया या पद्धतीत करता येतात. या पद्धतीच्या शस्त्रक्रियेची वैशिष्ट्ये अशी की कमी त्रास, कमी जखम, कमी रक्तस्त्राव, संसर्ग होण्याचे प्रमाण शून्य आणि चार दिवसात रुग्ण पूर्ववत बरा  होतो. ‘एमआयसीएस’ हे अगदीच उच्च तंत्रज्ञान आहे. भारतातील अगदी मोजक्याच शहरांमध्ये उपलब्ध असून हे तंत्रज्ञान वापरण्यासाठी वेगळ्या पद्धतीच्या मशीन्स आणि प्रशिक्षित डॉक्टर असावे लागतात.

या  पद्धतीने अथायु हॉस्पिटलमध्ये तीन रूग्णांवर शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पाडली आहे. यातील एक पेशंट मधुमेही रुग्ण होता. तसेच त्याला तीन ब्लॉकेजेस सुद्धा होत्या, तरीही या पद्धतीने केलेल्या सर्जरीमुळे तो रुग्ण बरा झाला आहे. या ‘एमआयसीएस’ पद्धतीने केलेल्या शस्त्रक्रियेमुळे रुग्ण कमी त्रासांमध्ये ठणठणीत बरा होतो.  तरी अशा पद्धतीची शस्त्रक्रिया करून घेण्यासाठी अथायु हॉस्पिटल उजळाईवाडी येथे संपर्क साधावा, असे आवाहन डॉ. कडलगी यांनी केले आहे.

यावेळी डॉ. सौरभ गांधी,  डॉ.  अमोलकुमार भोजे,  हॉस्पिटलचे चेअरमन अनंतकुमार  सरनाईक,  शस्त्रक्रिया झालेले रुग्ण संजीव देशपांडे,  योगिता नामदे  आदी उपस्थित होते.