‘मंत्रालय आपल्या दारी’ मोहिमेची सुरुवात कोल्हापुरातून ! : उदय सामंत

0
101

मुंबई (प्रतिनिधी) : राज्यातील सर्वच विभागीय सहसंचालक कार्यालयातील कामकाजाचा आढावा घेण्यासाठी ‘मंत्रालय आपल्या दारी’ अभियानाची सुरुवात कोल्हापूर जिल्ह्यातून करावी, अशी सूचना उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी विभागाचे प्रधान सचिव ओ. पी. गुप्ता यांना केली आहे. 

कोल्हापूर येथील उच्च शिक्षण विभागांतर्गत विभागीय सहसंचालक कार्यालयामध्ये सुरू असलेल्या कामकाजाची गंभीर दखल घेत राज्यातील सर्व विभागीय सहसंचालक कार्यालयांच्या कामकाजाचा आढावा घेण्याकरीता ३ महिन्यांचा कालबध्द कार्यक्रम तयार करण्याच्या सूचना विभागाचे सचिव गुप्ता यांना दिल्या आहेत. यानुसार मंत्रालय आपल्या दारी हा उपक्रम राज्यभर राबवणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच आ. प्रकाश आबिटकर यांनी कोल्हापूर येथे घेतलेल्या आढावा बैठकीमुळे विभागातील कामकाजाची सद्य:स्थिती आपल्या निदर्शनास आल्याचे ते म्हणाले.

या आढाव्यामध्ये राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे प्रधान सचिव, संचालक, उपसचिव, संबंधित कक्ष अधिकारी, संचालक कार्यालयातील संबंधीत अधिकारी यांनी उपस्थित राहण्याच्या सूचना करण्यात आल्या असून २५ जानेवारीपासून कोल्हापूरातून मोहिमेची सुरुवात केली जाईल. यामध्ये जे अधिकारी व कर्मचारी यामध्ये दोषी आढळतील त्यांना जागीच निलंबित करण्यात येईल असे त्यांनी सांगितले. सकाळी १० ते ६ या वेळेत बैठक आयोजिक केली जाईल. यामध्ये पहिल्या सत्रात महाविद्यालयीन व विद्यापीठाचे प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या विविध प्रश्न व दुपारच्या सत्रात संस्थांचे प्रतिनिधी यांच्याकरिता वेळ राखीव ठेवून प्रश्न निकाली काढण्यात येणार आहेत. बैठकीचे नियोजन शिवाजी विद्यापीठात करण्यात येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here