चंदगड (प्रतिनिधी) : गोवा बनावटीच्या दारूची अवैध वाहतूक करणारे वाहन पकडून एकाला ताब्यात घेण्यात आले. उमेश गोविंद आवढण (रा. तुडये) याला अटक केली. त्याच्याकडून ३ लाख ३० हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई पारगड रस्त्यावरील वाघोत्रे (ता. चंदगड) येथे आज (सोमवार) पहाटे तीनच्या सुमारास राज्य उत्पादन शुल्कच्या भरारी पथकाने केली.

याबाबतची अधिक माहिती अशी, राज्य उत्पादन शुल्क भरारी पथकाला चंदगड तालुक्यातील पारगड मार्गे सिंधुदुर्ग जिल्ह्याशी जोडलेल्या चोरट्या मार्गाने अवैधरित्या विदेशी मद्याची वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार भरारी पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी रविवारी रात्रीपासून या मार्गावर सापळा रचला होता. यावेळी पारगडकडून एक मारुती अल्टो कार (क्रं MHO6 W3006 ) येत होती. या कारची तपासणी केली असता गोवा बनावटीच्या विदेशी मद्याचे ३३ बॉक्स आढळून आले.

या कारवाईत भरारी पथकाचे निरीक्षक संभाजी बर्गे, दुय्यम निरीक्षक जगन्नाथ पाटील, किशोर नडे, मारुती पवार, सचिन काळेल, संदीप जानकर, सागर शिंदे,  जय शिनगारे यांनी सहभाग घेतला.