कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर प्रलंबित ठेवण्यात आलेल्या सहकारी संस्थांच्या निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. टप्याटप्याने गोकुळ, केडीसीसी, इतर काही साखर कारखान्यांसह छोट्या-मोठ्या संस्थांच्या निवडणुकीची तयारी प्रशासकीय पातळीवर सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर प्रमुख राजकीय पक्षात घडामोडींना सुरुवात झाली आहे. यामुळे सहकारी संस्थांमध्ये पदवीधर, शिक्षक मतदारसंघाप्रमाणे महाविकास आघाडी म्हणून की सोयीचे राजकारण रंगणार याबद्दल प्रचंड राजकीय कुतूहल निर्माण झाले आहे.

जिल्ह्यात गोकुळ दूध संघ ही अति महत्त्वाचे राजकीय आणि आर्थिक सत्ता केंद्र आहे. म्हणूनच एकवेळ आमदारकी नको, पण गोकुळचे संचालक करा, अशी विनवणी अनेकांची नेत्यांकडे असते. पाच वर्षापूर्वी माजी आमदार महादेवराव महाडिक, आमदार पी. एन. पाटील, हसन मुश्रीफ यांनी आघाडी करून निवडणूक लढवली. त्यांना अत्यंत कमी मतांच्या फरकाने सत्ता कायम ठेवण्यात यश मिळवले. दरम्यान, पाच वर्षात अनेक घडामोडी झाल्या. मल्टिस्टेटचा निर्णय एकाधिकारशाहीने घेतल्याचा आरोप करीत ना. मुश्रीफ यांनी नाराजी व्यक्त केली. ते गोकुळच्या राजकारणात पालकमंत्री सतेज पाटील यांच्यासोबत राहिले.

सध्याच्या ‘गोकुळ’मधील नेतृत्वावर नाराज असलेले अनेक ज्येष्ठ संचालकही बाहेर पडण्याच्या तयारीत आहेत. यातूनच ज्येष्ठ संचालक आणि माजी चेअरमन अरुण डोंगळे यांनी महाडिक ऐवजी मुश्रीफ यांचे नेतृत्व गोकुळमध्ये मानणार असल्याचे जाहीर केले आहे. हा केवळ ट्रेलर आहे, पिक्चर अजून बाकी आहे, असेही त्यांनी सूचित केले आहे. यामुळे ‘गोकुळ’मध्ये राजकीय उलथापालथी होण्यास सुरूवात झाली आहे, असे म्हणण्यास वाव आहे. गोकुळची निवडणुक महाविकास आघाडी म्हणून लढवायचा निर्णय झाला तर महाडिक यांचे सहकारी आणि काँग्रेसचे नेते आमदार पी. एन. पाटील यांची भूमिका काय राहणार, हे पाहणे महत्वाचे आहे.

केडीसीसीची यापूर्वीची निवडणूक पक्षीय पातळीपेक्षा गटतट, आघाडी एकत्र येऊनच लढवली जाते. या संस्थेवर आता मुश्रीफांची एकहाती सत्ता आहे. पाच वर्षांत त्यांनी बँकेच्या कामकाजावर चांगली पकड मिळवली आहे. म्हणून त्यांच्याच नेतृत्वाखाली या वेळचीही निवडणूक होईल, असे सध्याचे चित्र आहे. पण त्यांच्या पॅनेलमध्ये महाविकास आघाडीला कितपत स्थान मिळणार, हे समोर येण्यासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे.

मागील वेळी राजकीय आखाडा बनलेल्या येथील राजाराम साखर कारखान्यांची निवडणूकही यावेळी प्रतिष्ठेची बनणार आहे. महाडिक विरूध्द सतेज पाटील अशीच रंगत होणार आहे. येथेही महाविकास आघाडीच्या काय होणार की सोयीचे राजकारण होणार हेही पाहणे महत्वाचे ठरणार आहे. इतर सहकारी संस्थांत स्थानिक राजकारणानुसार लढत होत असते. यावेळी तशीच लढत होईल, अशी शक्यता आहे. बहुतांशी ठिकाणी भाजप विरुद्ध सर्व असेच चित्र राहील, असे सध्यातरी वातावरण आहे.