राधानगरी (प्रतिनिधी) : जिल्हा दूध संघाच्या (गोकुळ) आगामी निवडणुकीत राष्ट्रवादीचे नेते व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासोबत असेन, असे सांगून  आपण काँग्रेसमध्येच राहणार असल्याचे गोकुळचे ज्येष्ठ संचालक अरुण डोंगळे यांनी स्पष्ट केले. राधानगरी तालुक्यातील दुर्गमानवाड येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि प्रतिभाताई पवार यांच्या वाढदिवसानिमित्त अभिषेक डोंगळे युवा शक्तीच्या वतीने रक्तदान शिबिर झाले. यावेळी ते बोलत होते.

अरुण डोंगळे म्हणाले की, गोकुळच्या राजकारणात मी मंत्री मुश्रीफ यांच्याबरोबर जाणार असलो, तरी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार नाही. संस्था निवडणुकीत हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे कार्यकर्त्यानी गोंधळून जाऊ नये. डोंगळे घराण्याच्या  अनेक पिढ्या काँग्रेसमध्ये गेल्या आहेत. काँग्रेस पक्षावर अपार निष्ठा आहे.

मंत्री हसन मुश्रीफ  म्हणाले की, अरुण डोंगळे हे माझे चांगले मित्र आहेत. त्यांच्या घरगुती कार्यक्रमाला मी आलो आहे. डोंगळे यांनी ज्या उद्देशाने हा कार्यक्रम घेतला तो उद्देश सफल होवो, अशी गुगली टाकत  अरुण डोंगळे हे राष्ट्रवादी काँग्रेससोबत नाहीत. तर गोकुळच्या निवडणुकीत आपल्या सोबत असल्याचे सांगितले.

याप्रसंगी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए.वाय. पाटील,  भैया माने,  युवराज पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रा.  किसन चौगले यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते उपस्थित होते.

या कार्यक्रमाविषयी आणि डोंगळे यांच्या भूमिकेविषयी राधानगरी तालुक्यात उलट सुलट चर्चा होती.  आमदार पी. एन. पाटील समर्थक अनेक कार्यकर्त्यांनी डोंगळे हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू झाल्याने त्यांनी कार्यक्रमालाच गैरहजेरी लावली.

कार्यक्रमाला भोगावतीचे एकही संचालक उपस्थित नव्हते. त्यामुळे काँग्रेसकडून डोंगळे यांच्या हालचालीवर निरीक्षण होते. खुद्द डोंगळे यांचे पुतणे धीरज डोंगळे हजर नव्हते. त्यांचीही भूमिका निर्णायक असणार आहे.