जालना (प्रतिनिधी) : दिवाळीनंतर महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तविण्यात आली होती. त्यामुळे कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी पुन्हा काही निर्बंध लागू करण्यासाठी राज्य सरकार गंभीरपणे विचार करत आहे. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी लवकरच चर्चा करून निर्णय घेण्यात येणार असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. ते जालन्यात पत्रकारांशी बोलत होते.

टोपे म्हणाले की, नागरिकांची बिनधास्त राहण्याची प्रवृत्ती वाढत चालली आहे. त्यामुळे लॉकडाउन लावण्यात येणार नसला तरी शिथील करण्यात आलेले निर्बंध पुन्हा लावण्यात येतील. सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन होत नसल्याने कठोर निर्णय घ्यावा लागणार आहे. लग्न समारंभातील २०० नागरिकांची संख्याही कमी करण्याबाबत विचार केला जाईल. याबाबत पुढील दोन दिवसांत मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेऊन घोषणा केली जाईल, असे टोपे यांनी सांगितले. दरम्यान, तूर्त तरी टाळेबंदी करण्याचा विचार नसल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले होते. परंतु टोपे यांनी राज्यात पुन्हा निर्बंध लावणार असून मुख्यमंत्र्यांचीही तशी इच्छा असल्याचे म्हटले आहे.