इचलकरंजी (प्रतिनिधी) : ‘दरमहा ३०० युनिटसच्या आत वीज वापर असणाऱ्या राज्यातील सर्व घरगुती वीज ग्राहकांची लॉकडाऊन काळातील ६ महिन्यांची संपूर्ण वीज देयके माफ करण्यात यावीत, व त्या रकमेची भरपाई राज्य सरकारने करावी. अंतिम निर्णय होईपर्यंत घरगुती वीज बिले भरणार नाही आणि वीज पुरवठा तोडू देणार नाही’, अशा घोषणा करून या मागणीसाठी राज्यात सर्व जिल्ह्यांत महावितरण कंपनीच्या ‘जिल्हा कार्यालयाला ताला ठोको’ आंदोलन मंगळवार दि. २७ ऑक्टोबरला दुपारी ठीक १२ वाजता करण्यात येईल असे महाराष्ट्र राज्य इरिगेशन फेडरेशन, स्वाभिमानी शेतकरी संघटना, महाराष्ट्र वीज ग्राहक संघटना, कोल्हापूर शहर सर्वपक्षीय कृती समिती यांच्या वतीने जाहीर करण्यात आले आहे.

कोल्हापूर महावितरण कार्यालयासमोर ताला ठोको मध्ये जेष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील यांच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या  या आंदोलनामध्ये जिल्ह्यातील किमान १० हजार पेक्षा जास्त वीज ग्राहक आणि शेतकरी सहभागी होतील, असेही राजू शेट्टी, प्रताप होगाडे, विक्रांत पाटील किणीकर, आर. के. पोवार आदी प्रमुखांनी जाहीर केले आहे.