कोल्हापूर (प्रतिनिधी) : महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेबाबत प्राप्त तक्रार निवारण करण्यासाठी जिल्हास्तरीय समन्वय अधिकारी म्हणून जिल्हा पुरवठा अधिकारी दत्तात्रय कवितके व सहाय्यक जिल्हा समन्वय अधिकारी म्हणून सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी श्रीमती सरस्वती पाटील यांची नियुक्ती केली. यासंबंधीचा आदेश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी काढला.

दरम्यान, जन आरोग्य योजनेतून रूग्णांची मोठ्या प्रमाणात आर्थिक लूट सुरू आहे. योजनेतूनही आणि रूग्णांकडूनही भरमसाठी पैसे उकळत आहेत. यासंबंधी मोठ्या संख्येने तक्रारी प्रशासनाकडे येत आहेत. यावर लाईव्ह मराठीने वारंवार प्रकाशझोत टाकला आहे. याची दखल घेवून प्रशासनाने तक्रारींचा निपटारा होण्यासाठी दोन अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे.

महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य या योजनेमध्ये समाविष्ठ असलेल्या जिल्ह्यातील रुग्णालयांनी जास्तीत-जास्त प्रमाणात कोरोना बाधित व नॉन कोरोना रूग्णांना या योजनेअंतर्गत नोंदणी, उपचाराचे लाभ मिळवून देणे व त्याचबरोबर प्राप्त होणाऱ्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी समन्वय व सहायक समन्वय अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. त्यांचे मोबाईल क्रमांकही जाहीर करण्यात आले आहेत. जिल्हास्तरीय समन्वय अधिकारी तथा जिल्हा पुरवठा अधिकारी दत्तात्रय कवितके यांचा ९४२२०८७०७७ आणि सहाय्यक जिल्हा समन्वय अधिकारी तथा सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी श्रीमती सरस्वती पाटील यांचा ९२२६३४२९४३ असा मोबाईल क्रमांक आहे.