कोल्हापूर (प्रतिनिधी) : पट्टणकोडोलीत पहिल्यांदाच दुर्मिळ जातीचा हरीयाल पक्षी आढळला आहे. हा महाराष्ट्र राज्याचा पक्षी आहे. याला इंग्रजीमध्ये ( yellow footed green pigeons) य़ा नावाने ओळखले जाते.

पट्टणकोडोलीतील श्रीरीष बापू शिरगुप्पे आणि त्यांची मुलगी श्रुतिका शिरगुप्पे हे शेताकडे गेले असता त्यांच्या शेतात त्यांना जखमी अवस्थेत पडलेला एक पक्षी आढळला. यावेळी शृतिका हिला हा पक्षी वेगळा जातीचा असून जखमी असल्याचे निदर्शनास आले. त्यांनी तातडीने वन्य पशु पक्षी संरक्षण सामाजिक संस्थेचे प्रमुख पप्पू खोत यांना त्याची माहिती दिली. पप्पु खोत यांनी तातडीने धाव घेत तो महाराष्ट्र राज्याचा पक्षी हरियाल आहे असे सांगितले. जखमी अवस्थेत पडलेल्या पक्षाच्या पंखाला जखम झाल्यामुळे त्यातून रक्त येत होतं. पप्पू खोत यांनी तात्काळ प्राथमिक उपचार करून फॉरेस्ट डिपार्टमेंटचे  डॉक्टर संतोष वाळवेकर यांच्याकडे पुढील उपचारासाठी पाठवले.

आज पर्यंत वन्य पशु पक्षी संरक्षण सामाजिक संस्थेच्या माध्यमातून वृक्षारोपण व अनेक सर्पांना, पशु, पक्षी, प्राण्यांना जीवदान दिले आहे. मानव वन्यजीव संघर्षातून कोणताही जीवितास धोका निर्माण होऊ नये तसेच ते वन्यजीव आपल्या अधिवासात राहणे गरजेचे आहे. यासाठी संस्थेचे कार्य चालू आहे.