नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारने तिन्ही कृषी कायदे रद्द करून शेतमालाच्या आधारभूत किंमतीसाठी कायदेशीर तरतूद करण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांनी आंदोलन सुरु केले आहे.  याबाबत सोमवारी (दि.४) होणारी चर्चा निष्फळ ठरली, तर प्रजासत्ताक दिनी ट्रॅक्टर मोर्चा काढू, असा इशारा शेतकरी आंदोलकांनी दिला आहे.

याबाबत शेतकरी नेते दर्शनपाल सिंग आणि अभिमन्यू कोहार यांनी पत्रकार परिषदेत शेतकऱ्यांची भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले की, केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य केल्या नाहीत. तर २६ जानेवारी  प्रजासत्ताक दिनी आम्ही दिल्लीत ट्रॅक्टर परेड करु. राजधानी दिल्लीतील मुख्य परेडनंतर किसान परेड होईल.  आम्हाला शांततापूर्ण मार्गाने तोडगा हवा आहे. मोदी सरकारच्या आश्वासनांवर आम्हाला विश्वास नाही.

दरम्यान, मागील ३८ दिवसांपासून ऐन कडाक्याच्या थंडीत शेतकऱ्यांचे दिल्लीत आंदोलन सुरु आहे. यावर तोडगा काढण्यासाठी ४ जानेवारीला शेतकरी आणि सरकारची पुन्हा एकदा चर्चा होणार आहे. या चर्चेकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.  ही चर्चा निष्फळ ठरली तर आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा शेतकरी संघटनांनी दिला आहे.