कोल्हापूर (प्रतिनिधी) :  करवीर तालुक्यातील निगवे खालसा येथील शहीद जवान संग्राम पाटील यांच्या घराचे अधुरे राहिलेले स्वप्न पूर्ण करू, अशी ग्वाही ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. तसेच ना. मुश्रीफ यांनी निगवे खालसा येथे उद्या (सोमवार) होणाऱ्या अंत्यसंस्काराच्या ठिकाणी भेट दिली. तसेच ग्रामस्थांकडे विचारपूसही केली.

ना. मुश्रीफ म्हणाले की, शहीद संग्राम पाटील यांची पार्श्वभूमी शेतकरी कुटुंबाची आहे. त्यांच्या मागे आई- वडील , पत्नी व लहान मुले असा परिवार आहे. या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या दुःखातून सावरण्याची शक्ती आणि हिंम्मत परमेश्वराने पाटील कुटुंबीयांना द्यावी, अशी परमेश्वरचरणी प्रार्थना करतो. या परिवाराच्या पाठीशी हिमालयासारखे उभारणे, ही संपूर्ण समाजाची जबाबदारी आहे. कुटुंबीयांच्या व मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी पालकमंत्री सतेज पाटील, आमदार ऋतुराज पाटील  स्वीकारतीलच.  परंतु; मी आज वर्तमानपत्रात वाचले की शहीद जवान संग्राम पाटील यांचे घर बांधायचे स्वप्न अपुरे राहिले आहे. त्यांचे हे अपुले स्वप्न मी मुश्रीफ फाऊंडेशनच्या माध्यमातून पूर्ण करणार असल्याची ग्वाही दिली.

तसेच  जवान शहीद झाल्यानंतर थोडेच दिवस समाज त्यांना सहानुभूती दाखवतो. परंतु, काळाच्या ओघात पुढे विसरून जातो आणि या जवानांची कुटुंबेही उघड्यावर पडतात. असे न होता या शहीद जवानांच्या कुटुंबियांच्या पाठीशी आपण सदैव हिमालयासारखे उभे राहिले पाहिजे, असेही ना. मुश्रीफ म्हणाले.