इचलकरंजी (प्रतिनिधी) : इंधन दरवाढीसह जीवनावश्यक वस्तूंच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. राज्य व केंद्र सरकारच्या धोरणांमुळेच महागाई प्रचंड वाढल्याचा आरोप करीत आज (गुरुवार) डाव्या लोकशाही आघाडीच्या वतीने इचलकरंजीतील म. गांधी चौकात धरणे आंदोलन करण्यात आले. या वेळी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करत केंद्र व राज्य सरकारवर टीका केली.

फेब्रुवारीपासून पेट्रोल व डिझेलचे दर सातत्याने वाढत आहेत. त्यातच जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीही गगनाला भिडल्या आहेत. त्यामुळे सर्वसामान्य कामगार व कष्टकरी जनता मेटाकुटीला आली आहे. अशा परिस्थितीत राज्य सरकारने लॉकडाऊन काळातील वीजबिल माफ करावे, केंद्र सरकारने इंधन दरवाढ थांबवावी, महागाई रोखावी, कृषी कायदे मागे घ्यावेत, कामगार कायद्यांची मोडतोड करू नये, सर्वांना दर्जेदार, मोफत शिक्षण मिळाले पाहिजे, सरकारी आरोग्य व्यवस्था बळकट करा, स्त्रियांवर अत्याचार करणाऱ्यांना कडक शिक्षा झाली पाहिजे आदी मागण्यांसाठी हे धरणे आंदोलन केले.

या आंदोलनात माकपचे दत्ता माने, शिवगोंडा खोत, सदा मलाबादे, भाकपचे हनुमंत लोहार, मारुती आजगेकर, शिवाजी जाधव, लाल निशाण पक्षाचे धोंडिबा कुंभार, सुनिल बारवाडे, जनता दल सेक्युलरचे पद्माकर तेलसिंगे, जावेद मोमीन यांचेसह शिवाजी साळुंखे, इस्माईल समडोळे, सिकंदर मुल्ला, दिलीप जोशी सहभागी झाले होते.