कागल (प्रतिनिधी) : स्व.राजे विक्रमसिंह घाटगे फाउंडेशन आणि राजमाता जिजाऊ महिला समितीच्या संयुक्त विद्यमाने राजे विक्रमसिंह घाटगे आदर्श शिक्षक पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. राजमाता जिजाऊ महिला समितीच्या कार्याध्यक्षा नवोदिता घाटगे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही घोषणा केली.

पत्रकात म्हटले आहे की, शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. शाहू साखर कारखान्याच्या संचालिका श्रीमती सुहासिनीदेवी घाटगे आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांच्या संकल्पनेतून या पुरस्कारांची सुरुवात केली आहे. शैक्षणिक क्षेत्रात केलेल्या चांगल्या कार्याचा सन्मान व्हावा आणि इतरांना प्रेरणा मिळावी. या उद्देशाने हे पुरस्कार सुरू केले आहेत.

कागल, करवीर, आजरा आणि गडहिंग्लज तालुक्यातील शिक्षकांमधून या  पुरस्काराची निवड करण्यात येते. प्राथमिक विभागाकडील ३६ तर माध्यमिक विभागाकडील २५ अशा ६१ शिक्षकांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. सन्मानचिन्ह मानपत्र आणि कोल्हापूरी फेटा असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. पुरस्काराच्या वितरणाची तारीख आणि ठिकाण पुरस्कार प्राप्त शिक्षकांना लवकरच कळवीत असल्याचे पत्रकात म्हंटले आहे.