फेब्रुवारी किंवा मार्चमध्ये होणारी कोल्हापूर महापालिकेची निवडणूक भाजपासाठी सत्त्वपरीक्षाच ठरणार आहे. या वेळी तरी भाजपाचा झेंडा महापालिकेवर फडकणार का, या प्रश्नाच्या उत्तरासाठी काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे. तुल्यबळ किंबहुना अधिक सरस आणि सत्ताधारी असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर भाजपाला टक्कर द्यावी लागणार आहे.

एकट्या भाजपचा प्रतिस्पर्धी पक्षांसमोर निभाव लागणे कठीण आहे. पूर्वी युती असल्याने शिवसेना बरोबर होती. तिची ताकद मिळत असल्याने भाजपला किमान रिंगणात उतरण्याची संधी मिळत होती. मागील निवडणुकीत ताराराणी आघाडीचे बळ सोबत होते. मात्र, शिवसेनेने भाजपापासून चार हात लांब राहण्याची भूमिका घेतल्याने सत्तेपासून वंचित रहावे लागले. या वेळच्या निवडणुकीत ताराराणी आघाडीबरोबर जनसुराज्य शक्ती पक्षाचा आधार मिळण्याची शक्यता असली तरी भाजपाला महापालिकेची आगामी निवडणूक तितकीशी सोपी नाही, हे नक्की.

शहर आणि जिल्ह्यात प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांच्याशिवाय अन्य दुसरे प्रगल्भ, प्रभावी नेतृत्व नाही. सध्या जे नेते आहेत ते एक तर बालबुद्धीचे किंवा दुसऱ्या फळीतील आहेत. शहरातील सर्व ८१ प्रभागांवर त्यांचा प्रभाव नाही. इतकेच नव्हे तर ते ज्या प्रभागात राहतात त्या प्रभागातील भाजपा उमेदवार निवडून आणण्याची त्यांची ताकद नाही. त्यामुळे भाजपाची सगळी मदार दादांवर आहे.

माजी खासदार धनंजय महाडिक भाजपात आहेत. पण, त्यांची नाळ भाजपाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी तितकीशी जुळलेली नाही. शिवाय महापालिकेच्या निवडणुकीवर गेल्या काही वर्षांपासून वर्चस्व असलेल्या ताराराणी आघाडीची जबाबदारी त्यांच्याकडे असल्याने ते आघाडीकडे दुर्लक्ष करणे अशक्य आहे. त्यामुळे पक्षाची आणि आघाडीची जबाबदारी ते कितपत घेणार आणि पेलणार हाही मुद्दा महत्वाचा ठरणार आहे.

एका निवडणुकीत जनसुराज्य शक्ती पक्षाने महापालिकेच्या निवडणुकीत चांगलेच वातावरण तापवले होते. मात्र त्यामानाने काही मर्यादेतच त्यांना यश मिळाले. सध्या ही शक्ती किमान शहरात तरी अगदीच क्षीण झाली आहे. अस्तित्व नसल्यासारखे आहे. अशा शक्तीची भाजपाने मदत घेतली तरी ही शक्ती भाजपाला ‘बूस्ट’ देईल, याची खात्री नाही. राज्यात सत्तेत असताना भाजपा नेतृत्वाने मूळच्या म्हणजेच निष्ठावंत कार्यकर्त्यांना न्याय दिला नाही. त्यामुळे ते दुखावले. याउलट पक्षात नवीन घेतलेल्यांना पदांची खिरापत वाटली. त्यांनी पदे मिरवण्यापलीकडे काहीही केले नाही. त्याचाही फटका भाजपाला बसणार आहे.

एकूणच प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील, काही अंशी धनंजय महाडिक आणि भाजपाचा पारंपरिक मतदार यावरच पक्षाची मदार असणार आहे. एकट्या भाजपाला गतवेळे एवढ्या तरी जागा जिंकता येतील, असे सध्या तरी दिसत नाही. त्यामुळे महापालिकेवर भाजपाचा झेंडा फडकणार का या प्रश्नाचे उत्तर बऱ्याच अंशी नकारार्थीच आहे. परिणामी भाजपला महापालिकेची आगामी निवडणूक ही सत्त्वपरीक्षेची असणार हे निश्चित आहे.

                                                                                                                    -ठसकेबाज