कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्हा परिषदेत कोविडच्या काळात झालेल्या खरेदी घोटाळ्याची कॅग मार्फत चौकशी करण्यासाठी विधिमंडळात आवाज उठवावा, अशी मागणी जि. प. सदस्य राजवर्धन नाईक-निंबाळकर यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि आ. चंद्रकांतदादा पाटील यांचेकडे केली. निंबाळकर यांनी आज (गुरुवार) मुंबईत उभय नेत्यांची भेट घेऊन त्यांना याबाबतचे निवेदन दिले.

निवेदनात म्हटले आहे की, कोरोनाच्या काळात जिल्हा परिषदेमार्फत घाई गडबडीत केलेल्या ८८ कोटीच्या खरेदीत जवळपास ३५ कोटीचा भ्रष्टाचार झाला आहे. प्रशासनाने नियमबाह्य साहित्य खरेदी केलेली आहे. खरेदीची ज्या दिवशी अधिसूचना निघाली त्याच दिवशी घाई गडबडीत कमिटी गठीत करण्यात केली. शासनाचे नियम आणि अटी डावलून अवाजवी दराने साहित्य खरेदी केल्याचे लेखापरीक्षण अहवालात स्पष्ट केले असल्याचेही सांगण्यात आले. ज्या कंपनीने साहित्य पुरवले त्यामधील बऱ्याच कंपनीची नोंदणी त्याच दिवशी झाली आहे. काही पुरवठादार हे जीएसटीधारक नसल्याचे सांगण्यात आले. इलेक्ट्रॉनिक साहित्य, एन ९५ मास्क, थर्मल स्कॅनर यासह अनेक वस्तू या अवाजवी दरात खरेदी केल्या. या सर्व व्यवहारांत अनियमितता दिसून येते. या घोटाळ्याची कॅगमार्फत चौकशी करण्यासाठी आपण उभय नेत्यांनी विधिमंडळात आवाज उठवावा, अशी विनंती यामध्ये केली आहे.