बेंगळुरू (वृत्तसंस्था) : ब्रिटनमध्ये कोरोनाच्या नव्या विषाणूने डोके वर काढले. अनेकांना याची लागण झाल्याने काही भागात पुन्हा कडक लॉकडाऊन जाहीर केल्यानंतर भारतात काही राज्यांनी ताबडतोब रात्रीची संचारबंदी लागू केली. यामध्ये महाराष्ट्र, कर्नाटक या राज्यांचाही समावेश आहे. मात्र या निर्णयावर विरोधकांसह अनेक थरातून अत्यंत कडवट टीका झाली. यामुळे कर्नाटक सरकारने आज (बुधवार) ऐन ख्रिसमसच्या पूर्वसंध्येला रात्रीच्या संचारबंदीचा निर्णय मागे घेतला असल्याची घोषणा केली आहे.

महाराष्ट्रासह कर्नाटकात कोरोनाचा प्रसार आटोक्यात आला असं वाटत असतानाच रात्रीची संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यामुळे नवीन वर्षाच्या पार्टीचे आणि ख्रिसमस सेलिब्रेशनचे प्लॅनही आटोपते घ्यावे लागणार असल्याने नागरिकांत संतापाची भावना होती. कर्नाटकात या निर्णयावर मजबूत टीका झाली. अखेर आज ख्रिसमसच्या आदल्या दिवशी रात्रीच्या संचारबंदीचा निर्णय कर्नाटक सरकारने हा निर्णय मागे घेत नाताळच्या प्रार्थनेला रात्री परवानगी दिली. रात्रीच्या संचारबंदीचा निर्णयही मागे घेतला. राज्याच्या तांत्रिक सल्लागार समितीने परिस्थितीचा आढावा घेऊन आत्ता कर्फ्यूची गरज नसल्याचं सांगितल्याने तो आदेश मागे घेत आहोत’, असं कर्नाटकच्या मुख्यमंत्री कार्यालयाने स्पष्ट केले आहे.