मुंबई (प्रतिनिधी) : शेतकरी आंदोलनादरम्यान पंजाबच्या भटिंडा येथील महिंदर कौर या आजीबद्दल  आक्षेपार्ह ट्वीट करणे अभिनेत्री कंगना राणौतला महागात पडण्याची शक्यता आहे. कंगनावर मानहानीचा दावा ठोकण्यात आला असून सोमवारी (दि.११) यावर  सुनावणी होणार आहे.  कंगनाने माझी तुलना अन्य एका महिलेसोबत करून माझ्यावर चुकीचे आरोप केले,  असे या आजीने आपल्या तक्रारीत म्हटले आहे.

ही आजी शेतकरी आंदोलनात सहभागी झाली होती. आंदोलनात झेंडा हाती घेतलेल्या या आजीचा फोटो शेअर करत,  अशा महिला १००  रूपयांसाठी कोणत्याही आंदोलनात सामील होतात. शाहीन बागमध्येही हीच महिला होती आणि आता शेतकरी आंदोलनातही तीच आहे , असे ट्वीट कंगनाने केले होते.

या ट्वीटवरून मोठा वाद निर्माण झाला होता. यावर महिंदर कौर यांनीही एक व्हिडिओ शेअर करत कंगनाला फैलावर घेतले होते. माझ्याकडे १३  एकर जमीन आहे. १०० रूपयांसाठी मला कुठेही जाण्याची गरज नाही. पण कोरोनामुळे कंगनाकडे काम नसेल तर तिनेच माझ्या शेतात काम करायला यावे,  अशा शब्दांत आजींनी कंगनावर निशाणा साधला होता.