पिशवी येथील वनराईतील आगीची चौकशी करा..!

झाड फौंडेशनच्या सदस्या प्रियांका इंगवले यांचे तहसीलदारांना निवेदन

0
185

बांबवडे (प्रतिनिधी) : पिशवी (ता.शाहूवाडी) येथील देवमाळ परिसरातील वनराईमध्ये अज्ञाताने लावलेल्या आगीत दुर्मीळ वृक्ष, वनस्पती, नैसर्गिक संसाधनांचे मोठे नुकसान झाले आहे. तरी या आगीची चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी झाड फौंडेशनच्या सदस्या प्रियांका इंगवले यांनी शाहूवाडीचे तहसीलदार यांच्याकडे केली आहे.

याबाबत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पिशवी येथील देवमाळ परिसरातील गायरान जमीन गट क्रं. ११९७ मध्ये शासनाच्या वृक्षारोपण अभियानार्तंगत हरित सेना, झाड फौंडेशन, महसूल विभाग आणि ग्रामपंचायतीच्या माध्यमातून मागील १० वर्षात वृक्षारोपण करण्यात आले आहे. येथे १६ फेब्रुवारीरोजी अज्ञात व्यक्तीकडून खोडसाळपणाने आग लावण्याचा प्रकार घडला आहे. या आगीच्या वणव्यात दुर्मीळ वृक्ष, वनस्पती, नैसर्गिक संसाधने भस्मसात झाली आहेत. या वनराईच्या शेजारील जागेत गावातील कचरा ग्रामपंचायतीच्या घंटागाडीतून आणला जातो. तसेच हा कचरा दरदिवशी पेटवला जातो. त्यामुळे येथे हा वणवा पेटण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरी या आगीची सखोल चौकशी करून दोषींवर गुन्हा दाखल करून कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here