चेन्नई  (वृत्तसंस्था) : भारतीय संघाचा गोलंदाज अक्षर पटेल आणि अनुभवी आर. अश्विन यांच्या भेदक माऱ्यासमोर इंग्लंडच्या फलंदाजांनी नांगी टाकली. ४८२ धावांच्या आव्हानांचा पाठलाग करताना इंग्लंडचे दिग्गज फलंदाज  ढेपाळले. इंग्लंडचा संघ १६४ धावांतच गुंडाळला . आणि चेपॉक मैदानावर झालेली दुसरी कसोटी  भारतीय संघाने ३१३ धावांनी जिंकली. या विजयासाह भारतीय संघाने मालिकेत १-१ अशी बरोबरी केली.

सलामीचा आघाडीचा फलंदाज रोहित शर्माची शतकी खेळी,  आर. अश्विनची अष्टपैलू कामगिरी आणि अक्षर पटेल याची  भेदक गोलंदाजी  या बळावर भारतीय संघाने दुसऱ्या कसोटी सामन्यात विजय मिळवला. पहिल्या डावांत रोहित शर्माने १६१ धावा केल्या. त्यामुळे संघाला ३२९ धावा पर्यंत मजल मारता आली.  पहिल्या डावात  अश्विनने ५ बळी घेतले. तर दुसऱ्या डावात तीन बळी मिळवत सामन्यात ८ बळी मिळवले आहेत.

तसेच  दुसऱ्या डावांत अश्विनने शतक  झळकावले. अक्षर पटेल याने दुसऱ्या डावांत भेदक  मारा करत ५ बळी टिपले . कुलदीप यादव याने २ बळी  घेतले . ऋषभ पंत आणि अजिंक्य रहाणे याने पहिल्या डावांत अर्धशतकी खेळी केली होती. तर दुसऱ्या डावांत विराट कोहलीने अर्धशतक  केले .  दरम्यान, भारतीय गोलंदाजापुढे इंग्लंडच्या फलंदाजांचा निभाव लागला नाही. इंग्लंडच्या एकाही फलंदाजाला ५० धावाही करता आल्या नाहीत.