सिडनी (प्रतिनिधी) : सिडनी येथे सुरू असलेल्या भारत – ऑस्ट्रेलिया कसोटीच्या चौथ्या दिवशी मैदानात चांगलाच राडा झाला. भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजला वर्णद्वेषी शेरेबाजीचा सामना करावा लागला. मैदानावर घडलेल्या या प्रकाराबाबत भारतीय क्रिकेट संघाने पंचांकडे औपचारिक तक्रार केली. त्यानंतर मैदानातील काही चाहत्यांचा प्रकार सुरूच राहिल्यांना खेळ थांबवण्याची वेळ आली.

सिराज सीमारेषेवर फिल्डिंग करत असताना काही चाहत्यांनी त्याच्याबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी केली. यावर त्याने सुरूवातीला दुर्लक्ष केले, पण त्यांच्याकडून वर्णद्वेषी टीका थांबत नसल्याने त्याने थेट कर्णधार अजिंक्य रहाणे आणि पंचांच्या कानावर ही बाब घातली. त्यानंतर बराच काळ खेळ थांबवण्यात आला होता. मैदानातील सुरक्षारक्षकांनी सिराजच्या तक्रारीनंतर तेथील चाहत्यांची चौकशी केली आणि अखेरीस तेथील काही चाहत्यांना तेथून बाजूला केले.