नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना साथीमुळे विद्यार्थ्यांच्या परीक्षांवर परिणाम झाला. त्यामुळे सीबीएसई १० वी आणि १२ बोर्डाचे पेपर नेमके कधी होणार, याबाबत विद्यार्थ्यांना प्रश्न पडला होता. याबाबत केंद्रीय शिक्षणमंत्री डॉ. रमेश पोखरियाल यांनी जानेवारी किंवा फेब्रुवारीमध्ये बोर्डाच्या परीक्षा घेतल्या जाणार नाहीत, असे स्पष्ट केले आहे.

पोखरियाल यांनी आज (मंगळवार) देशभरातील शिक्षकांशी ऑनलाईन संवाद साधताना हे महत्त्वाचे विधान केले आहे. ते म्हणाले की, दरवर्षी १५ फ्रेब्रुवारीपासून बोर्डाच्या परीक्षांचे आयोजन केले जाते. मात्र यावर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता जानेवारी, फेब्रुवारीमध्ये परीक्षा घेणे शक्य नाही. परीक्षा कधी घेता येईल, याविषयी विचारविनिमय केल्यानंतरच अंतिम निर्णय घेण्यात येईल. परीक्षेविषयीची सर्व माहिती वेळोवेळी विद्यार्थ्यांना दिली जाईल.

कोरोना व्हायरस संसर्ग लक्षात घेता विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी सीबीएसई बोर्डने ३० टक्के अभ्यासक्रम कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. लॉकडाऊनमुळे शाळा, कॉलेज बंद आहेत. यामुळे विद्यार्थ्यांवर अभ्यासक्रमाचा भार येऊ नये यासाठी सीबीएसई इयत्ता ९ ते १२ चा अभ्यासक्रम २०२०-२१ शैक्षणिक वर्षासाठी ३० टक्के कमी करणार असून महत्त्वाच्या विषयांच्या कन्सेप्ट अभ्यासक्रमात राहणार आहेत.