मुंबई (प्रतिनिधी) : कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात येत असताना  महाराष्ट्रात ‘बर्ड फ्लू’चा  शिरकाव झाल्याने राज्य सरकारने उपाययोजना करण्यास सुरूवात केली आहे. ‘बर्ड फ्लू’बाबत योग्य दक्षता घेण्यासाठी  राज्याचे पशूसंवर्धनमंत्री सुनिल केदार यांनी जनेतच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने काही महत्वपूर्ण सूचना केल्या आहेत.

अंडी किंवा कोंबडीचे मांस आपण विशिष्ट तापमानावर अर्धा तासापर्यंत शिजवले, तर त्यातील जीवाणू मरून जातो. हे शास्त्रीयदृष्ट्या सिद्ध झालेले आहे. तुम्ही अंडी उकडणार असाल किंवा अंड्यांचे इतर काही पदार्थ करणार असाल, अथवा चिकन खाणार असाल तर त्याला अर्धा तास ७० डिग्री अंशावर शिजवले पाहिजे. त्यामुळे त्यातील जीवाणू मरून जातील,  असे मंत्री केदार यांनी सांगितले आहे.

२००६ पेक्षा आत्ताचा बर्ड फ्लू वेगळा असल्याने  कोणत्याही पोल्ट्री चालकांनी माहिती लपवू नये, असे आवाहन केदार यांनी केले आहे. परभणी जिल्ह्यात ८० हजार कोंबड्या माराव्या लागणार आहेत, असेही त्यांनी म्हटले आहे. पुणे आणि नागपुरात भोपाळच्या लॅबच्या तोडीची लॅब तयार करण्यात आली  आहे. तिथे सँपल टेस्टींगची परवानगी लवकरच मिळेल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज सायंकाळी ५ वाजता ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी राज्यातील बर्ड फ्ल्यू रोखण्यासाठी आढावा बैठक घेणार आहेत.