कोल्हापूर (प्रतिनिधी) : शिवाजी विद्यापीठाने आज (गुरुवार) विद्यार्थ्यांच्या हिताचा महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर केला आहे. शैक्षणिक वर्ष २०२०-२१ साठी परीक्षा शुल्कवाढीस स्थगिती देण्यात आली आहे. विद्यापीठाचे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक गजानन पळसे यांनी याबाबतचे पत्रक प्रसिद्ध केले आहे.

पत्रकात म्हटले आहे की, यंदा कोरोनाच्या साथीमुळे अनेक विद्यार्थ्यांच्या पालकांना बिकट आर्थिक संकटाला सामोरे जावे लागले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना वाढीव परीक्षा शुल्क भरणे शक्य होणार नाही. यास्तव विद्यापीठ अधिकार मंडळाच्या ठरावानुसार,  शैक्षणिक वर्ष २०२०-२१ साठी परीक्षा शुल्कवाढीस स्थगिती देण्यात आली आहे. विद्यापीठाशी संलग्न असलेली सर्व महाविद्यालये, मान्यताप्राप्त शिक्षण संस्था, अधिविभागाचे प्रमुख, प्राचार्य, संचालक यांना याबाबतचे पत्र पाठविण्यात आले आहे. या निर्णयाने विद्यार्थी, पालकांत समाधान व्यक्त होत आहे.